दुनियादारी

दुनियादारी….नुसते तरुणांनी, महाविद्यालयीन युवकांनीच नाही तर प्रत्येकाने बघावा असा दर्जेदार मराठी चित्रपट! duniyadariचित्रपटात सत्तरच्या दशकातील महाविद्यालयीन मित्रांची कथा दाखविण्यात आली आहे. प्रेम, मैत्री ही नुसती म्हणण्यापुरतीच अतूट नाती नसतात, तर ती जन्मभर निभवायची असतात मग त्याचा परिणाम काहीही असो हे चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चित्रपट बघितल्यावर निव्वळ मनोरंजनाव्यतिरिक्त बरंच काही मिळतं. ज्येष्ठांना त्यांचे महाविद्यालयीन जीवन आठविणारा, तरुणांना प्रेम आणि मैत्रीप्रती आपली निष्ठा आणि श्रद्धा शिकविणारा असा हा चित्रपट आहे. महाविद्यालयातील गमती-जमती, हाणा-माऱ्या, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स, त्यांच्यातील विनोद बघून महाविद्यालयीन जीवनडोळ्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही. चित्रपटातील संवाद आपल्या ‘संवाद्कोषात’ भर घालणारेच आहेत.

चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिका उत्कृष्ट निभावल्या आहेत. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी आणि सई ताम्हणकर विशेष भाव खाऊन जातात. जितेंद्र जोशी थोड्या वेगळ्या खलनायकी भूमिकेतही उठून दिसतो. चित्रपटाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या अगदी छोट्या भूमिकेत दिसणाऱ्या कै. आनंद अभ्यंकर यांचा बहुदा हा शेवटचा चित्रपट असावा. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट कै. सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ ह्या कादंबरीवर आधारित आहे.

संपूर्ण कुटुंबासमवेत एकवेळ आवर्जून बघावा इतका सुंदर चित्रपट आहे.