कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी : दुर्गाशक्ती नागपाल

सध्या देशात ‘दुर्गाशक्ती नागपाल’ हे नाव फार गाजतंय! कारणही तसेच आहे.Durga_IAS दुर्गाशक्ती ह्या २८ वर्षीय तरुण कर्तव्यदक्ष आय.ए.एस. अधिकारी. उत्तरप्रदेशातील गौतम बुद्ध नगरच्या उपविभागीय अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. उत्तरप्रदेशातील राजकारण आणि परिस्थिती सर्वश्रुत आहे. बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आल्याने वाळूमाफियांचा सुळसुळाट चांगलाच वाढला आहे. दुर्गाशक्ती यांनी यांच्या अखत्यारीतील यमुना आणि हिंडोन नदीपात्रातील बेकायदा वाळूउपशावर आळा घालण्याचे काम त्यांनी हाती घेतले. कसलीही कसूर न करता कडक कारवाई करीत सहाच महिन्यात वाळूच्या तब्बल ३०० ट्रोली जप्त केल्या. त्यांच्या कारवाईने त्या भागातील बेकायदा वाळूउपशावर गदा तर आलीच मात्र वाळूमाफियांनीही कारवाईची धसका घेतला. राजकीय लागेबांध्यांचा वापर करून वाळू माफियांकडून दुर्गाशक्ती यांना हटविण्याच्या हालचालींनाही वेग आला. मात्र निश्चित कारण मिळत नव्हते.

त्यातच एका ठिकाणी सरकारी जमिनीवर धार्मिक स्थळ उभारण्याकरिता भिंत उभी राहिली आणि याची खबर दुर्गाशक्ती यांना मिळाली. दुर्गाशक्ती यांनी तत्काळ ती भिंत हटविण्याचे आदेश दिले. भिंत पाडल्याने जातीय सलोख्याला बाधा पोहोचल्याचे कारण देत दुर्गाशक्ती नागपाल यांना तत्काळ निलंबित करण्यात सरकारने कसलीही कसूर केली नाही. मात्र, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालानुसार अशी कुठलीही भिंत दुर्गाशक्ती नागपाल यांनी पडल्याचे म्हटले नाहीये.

मुळात बेकायदा वाळू उपसा असो वा सरकारी जागेवर धार्मिक वा अन्य बांधकाम ह्या गोष्टी निंदनीयच आहेत आणि त्यावरील करवाईले विरोध करणे निव्वळ चुकीचे. कुठलीही भीडभाड न ठेवता कार्यतत्परता दाखविल्याने ज्या दुर्गाशक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप पडायला हवी होती त्यांच्या निलंबनाची कारवाई करणे म्हणजे सत्ताधाऱ्यांची राजकीय अपरिपक्वताच प्रदर्शित करते. दुर्गाशक्तींवरील कारवाईमुळे वाळूमाफियांसह सर्वच माफियांचे मनोबल वाढेल आणि बेकायदा कामे सुरूच राहतील. कारवाईच्या भीतीने सरकारी अधिकारी त्याकडे सोयीस्कर रीतीने दुर्लक्ष करतील. यातून एखादा अनुचित प्रकार घडलाच तर त्याचे खापर मात्र ह्याच सरकारी अधिकाऱ्यांच्याच माथी फोडले जाईल.

कुठल्याही कामाची गुणवत्ता चांगली असण्यासाठी अथवा चांगली प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांची गरज असते. असे अधिकारी सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेण्यास आणि बेकायदा कामे करणाऱ्यांना धडा शिकविण्यास समर्थ असतात. दुर्गाशक्ती यांच्या कामातून हे गुण दिसतात. म्हणून त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करणे गरजेचे आहे. असे केल्याने कर्तव्यदक्ष अधिकार्यांना प्रोत्साहन तर मिळेलच मात्र माफियाराजलाही आळा बसेल.

One Comment