विजयाने उन्मंत झालेल्या ब्रिटीश खेळाडूंकडून विकृतपणाचे प्रदर्शन…..

             खेळांत जय-पराजय चालूच असतात. जसे पराजयाने खचून जाऊ नये असे म्हणतात, तसे विजयाने उन्मंतही होऊ नये. तुम्ही मिळविलेला विजय हा तुम्ही केलेल्या चांगल्या खेळाची पावती असते. त्यामुळे विजयाचा जल्लोष करणे चुकीचे नसले तरीही त्यात शिस्त असणे महत्वाचे आहे.ashes

जवळपास संपूर्ण जगावर राज्य केलेल्या ब्रिटिशांनी त्याच जगाला ‘क्रिकेट’ हा खेळ भेटही दिला. ह्या खेळातील नियम, खेळतांना पाळावयाची शिस्त आंनी एकूणच क्रिकेट ह्या खेळाची रचना ह्यामुळे हा खेळ ‘सभ्य लोकांचा खेळ’ म्हणून ओळखला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे सध्या जगात केवळ १६च देश असले तरीही फुटबॉल नंतर जगात क्रिकेट हा खेळच अधिक लोकप्रिय आहे. जगाला क्रिकेटची भेट देणाऱ्या ब्रीटिशांच्याच संघाने विजयाच्या हवा डोक्यात शिरल्याने जे असभ्य आणि विकृत कृत्य केल्याने त्यांनी मिळविलेल्या विजयामुळे त्यांची वाहवा होण्यापेक्षा ‘छी-थू’च अधिक होत आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात जी चुरस आणि खुन्नस पाहायला मिळते, त्यानंतर नंबर लागतो तो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या ‘अॅशेस’ मालिकेचा. पांच सामन्यांची ही मालिका शेवटचे दोन सामने अनिर्णीत राहिल्यावरही इंग्लंडने सुरवातीचे तीनही सामने जिंकत ३-० अशी जिंकली. ब्रिटीश संघाचा खेळ नक्कीच वाखाणण्याजोगा होता! इंग्लंड संघाने विजयानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी मैदानाला चक्कर मारून, शॅम्पेन उडवून, नाचत आनंद साजरा केला. मात्र अॅलेस्टर कुकच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश संघातील काही प्रमुख खेळाडूंनी चक्क विजय मिळविलेल्या ओव्हल मैदानाच्या पिचवरच लघवी करून विकृतपणाचे दर्शन घडविले. असं करणारे खेळाडू कुणी नवखे होते असही नाही. स्टुअर्ट ब्रॉड, केविन पीटरसन आणि जेम्स अँडरसन ह्या ब्रिटीश संघातल्या रथी-महारथी खेळाडूंनी हा हीन प्रकार केला.

ज्या मैदानावर आपल्याला आपले कौशल्य दाखण्याची संधी मिळते, विजय मिळवितो, सगळ्यांची वाहवा मिळवितो ते मैदान खेळाडू पवित्र मानतात. त्यातही ओव्हलचे मैदान क्रीकेटविश्वात ऐतिहासिक मानले जाते. इंग्लंडमधील लॉर्डस ह्या मैदानानंतर ओव्हल महत्वाचे मैदान मानण्यात येते. त्याच मैदानावर इंग्लंडच्या खेळाडूंनी अशी बेशिस्त प्रदर्शित करावी हे नक्कीच दुर्दैवी आहे.

काही वर्षांपूर्वी भारतीय संघाने ‘लॉर्डस’वर नेट-वेस्ट तिरंगी चषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ३२५ धावांचा यशस्वी पाठलाग करून विजय मिळविला होता. इंग्लंडला त्यांच्या घरच्याच मैदानावर आणि त्यातही क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर विजय मिळविल्याने आनंदित झालेल्या भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने आपला टी-शर्ट काढून गोल फिरविला. लॉर्डसवर गैरकृत्य करून मैदानाचा अवमान केल्याचा ठपका ठेऊन ब्रिटीश प्रसिद्धी माध्यमांनी त्याला टार्गेट केले होते. ब्रिटीश खेळाडूही यात मागे नव्हते. आता त्यांच्याच खेळाडूंनी इतके हीन वर्तन केल्यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सार्या क्रीकेटविश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.