शिवरायांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष म्हणजे सी.बी.एस.ई.चे अज्ञानच….!

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील जनतेकरीता केवळ इतिहासातील एक महानायक नसून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे! Chhatrapati_Shivaji_Maharaj सुलतानी संकटाच्या पाशवी अत्याचारांना मनगटाच्या जोरावर, तलवारीच्या भाषेत सडेतोड उत्तर देऊन महाराजांनी महाराष्ट्रात ‘हिंदवी स्वराज्य’ निर्माण केले! हे स्वराज्य महाराज स्वतःचे नाही तर ‘रयतेचे स्वराज्य’ म्हणून संबोधत. स्वराज्याचा कारभार सांभाळता सांभाळता कृषी, सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा उपक्रमही महाराजांनी राबविला.

महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन देश-विदेशातील अनेक साहित्यिकांनी महाराजांच्या जीवनावर साहित्यनिर्मिती केली. महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे, बखरी, पुस्तके कमालीची लोकप्रिय ठरली आहे. महाराजांची जीवनशैली, कार्यशैली आजही मार्गदर्शक ठरते. भारतभेटीवर आलेल्या तत्कालीन अनेक विदेशी प्रवासींनी शिवरायांच्या कार्याची स्तुती केलेली आजही आपल्याला बघायला मिळते. असे असतांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई.)ने सातवी ते बारावीच्या इतिहासातील पुस्तकात महाराजांसंबंधी इतिहासाची केवळ एका ओळीत समाप्ती केली. ही बाब निश्चितच स्वीकारार्ह नाही!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आदर्श आहेत! त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. असे असतांना सी.बी.एस.ई.ने केलेली ही चूक म्हणजे म्हणजे महाराजांच्या प्रतिमेकडे दुर्लक्ष करण्यासारखाच प्रकार आहे. अनेक विदेशी आक्रमकांनी भारतावर आक्रमण करून राज्य केले, त्यांच्यासंदर्भातील अनेक प्रकरणे सी.बी.एस.ई.च्या अभ्यासक्रमात अभ्यासाकरिता समाविष्ट केले जातात आणि शिवाजी महाराजांच्या वाट्याला फक्त एकाच ओळ दिली जाते, हे म्हणजे हा अभ्यासक्रम बनविणारयांचे अज्ञानच प्रदर्शित करते. सी.बी.एस.ई.ने लवकरात लवकर आपली चूक सुधारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला आपल्या इतिहासाच्या पुस्तकात यथोचित स्थान देऊन शिवरायांच्या कार्याचा गौरव करावा !