फादर्स डे : वडिलांचा गौरव करण्याचा हा दिवस

आज जून महिन्यांतील तिसरा रविवार!  fathers-day-marathi

हा रविवार ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो! वडिलांचा गौरव करण्याचा हा दिवस!

आई आणि मुलाचं नातं जास्त जिव्हाळ्याचं समजलं जातं, तेवढं महत्व वडिलांशी असलेल्या नात्याला दिलं जात नाही. ह्याचं विषयावर बोट ठेऊन ह.भ.प. वासुदेव महाराज आर्वीकर यांनी आपल्या एका प्रवचनांत वडिलांची महती सांगितली होती. काळजाला भिडणारी, डोळ्यांतून अश्रू आणणारी, विचार करायला लावणारी ही महती शब्द रूपांत तुमच्यासमोर शब्दरूपांत सादर करीत आहोत .

आईला जेवढं प्राधान्य आहे ना तेवढंच वडिलांना आहे! वडील कमी समजू नका. वडिलांना कमी समजू नका. वडिलांना कमी लेखू नका. आई घराचं मांगल्य आहे, तर बाप घराचं अस्तित्व आहे! पण आम्ही घरच्या अस्तित्वाला ओळखतंच नाही. अरे, जन्म देणारी आई तुम्हां-आम्हां-सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण रात्रभर दवाखान्यांत चकरा मारणाऱ्या बापाला आम्ही सहज विसरतो.
अरे, शाळेमध्ये पोरगं जर पहिला आला ना आई सगळ्यांना सांगते ‘माझा पोरगा पहिला आला! माझा पोरगा पहिला आला!’ पण, गपचूप हॉटेलमध्ये जाऊन पेढ्यांचा बॉक्स आणणाऱ्या बापाला आम्ही सहज विसरतो. अरे तो बाप आपल्या पोरीला पन्नास रुपये देतो, पोरगाला वीस रुपये देतो. पोरगी पन्नास रुपये घेते ब्युटी पार्लरला जाते, पोरगा वीस रुपये घेतो सलूनमध्ये जातो. पण, त्याचं घरातला बाप दाढी करण्याचा साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणाने दाढी करणारा तो बापच असतो! अरे तो बाप पोरीला नवे कपडे घेईल, आपल्या पोराला नवे कपडे घेईल, पत्नीला नवी साडी आणेल, पण स्वतः बाप फाटकेंच कपडे वापरेल! आई रडून मोकळी होत असते, बिचाऱ्या बापाला रडता येत नाही. नाही रडता येत हो त्याला!
अगं, स्वतःचा बाप मेला तरी रडता येत नाही. कारण, लहान भावांचा सांभाळ करावा लागतो ना! स्वतःची आई मेली तरी रडता येत नाही, लहान बहिणींचा सांभाळ करावा लागतो! अरे छोटं संकट आलं तर आई आठवते पण, मोठ्या वादळाला तोंड देणारा तो बापंच! रस्त्यांने चला, रस्त्याने चालता-चालता पायाला ठेच लागली ना ‘आई गं’ हा शब्द निघतो. पण पुढे गेल्यानंतर मोठा सर्प दिसू द्या, ‘बाप रे’ हेच वाक्य बाहेर निघेल! आपल्याला वाटत असेल बाप म्हणजे तापट स्वभावाचा असतो, बाप म्हणजे मारझोड करणारा असतो, बाप म्हणजे व्यसनी, नाही! अरे, बापाला जर बघायचं असेल ना, नारळ बघा तुम्ही नारळ! नारळ जर वरून जरी कडक असेल, पण ते नारळ फोडल्यावर अमृतासारखं गोड पाणी देणारा तो बाप असतो. आई रडून मोकळी होत असते, बिचाऱ्या बापाला रडता येत नाही माय-बाप हो!
छत्रपति शिवाजी महाराजांना घडवणारी मांसाहेब जरूर होती, पण त्यांच धावपळीच्या काळामध्ये शिवनेरी गडावर नेणाऱ्या शहाजीराजांना कधी विसरू नका! प्रभू रामचंद्राला जन्म देणारी आई जरूर होती, पण, ‘राम-राम-राम-पुत्र-पुत्र’ करणारा, तडफडून मारणारा बाप दशरथच होता! यशोदेचं-देवकीचं गुणगान जरूर गा, पण यमुनेच्या पुरातून भगवान श्रीकृष्णाला नेणाऱ्या वासुदेवाला कधी विसरू नका! आई रडून मोकळी होत असते, बिचाऱ्या बापाला रडता येत नाही बापहो!
लग्नाचा प्रसंग एखादी डोळ्यासमोर ठेवा, एखाद्या पोरीचं लग्न जमलं, लग्न जमल्यापासून ती पोरगी आईला मिठी मारते, ‘आई, आई माझं कसं होईल गं आई?’ आई धीर देते, म्हणते ‘बाळा, चांगलं होईल बेटा तुझं’. तो दुसरा दिवस, मंडप टाकलेला आहे, मंडपात सगळे पाहुणे येतात, पाहुण्यांना नाष्टा दिला जातो. सगळे पाहुणे पारावर जातात. नाचत-नाचत-नाचत मंडपाच्या गेटवरती येतात. आंतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये अक्षदा दिल्या जातात, ब्राम्हणांना, ब्राम्हण देवता मंगलाष्टकं म्हणायला सुरुवात होते. मंगलाष्टकं झाल्यावर फटाक्यांची आतषबाजी होते, ढोलताशांचा नाद होतो, सगळी बसलेली मंडळी त्यांच्या अंगावर अक्षदा टाकतात, पती-पत्नी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार टाकतात. सगळे लोक जेवायला बसतात, आणि एकेक पंगत उठायला सुरुवात होते. आणि बघता-बघता-बघता संध्याकाळची वेळ होउन जाते, भगवान सुर्यनारायण डुबण्याची वेळ, आणि ती पोरगी माहेराला सोडून सासरी जाण्याची वेळ, आणि ज्यावेळेस हे दुसरं दृश्य आई बघते, आई धावत-धावत जाते, पोरीला मिठी मारते, ‘ताई, ताई तुझं कसं होईल गं ताई, ताई तुझं कसं होईल गं?’ आणि ते दृश्य त्या घरांतला बाप बघतो, आणि बाप धावत-धावत जातो, आणि आपल्या पत्नीला सांगतो ‘काय गं? कशाला रडते गं? अगं आपली पोरगी आहे ती, पतीला चांगलं ठेवेल, सासूला चांगलं ठेवेल, सासऱ्याला चांगलं ठेवेल, जेठाला चांगलं ठेवेल, देराला चांगलं ठेवेल! अगं वेडी, पोरगी म्हणजे परक्याचं धन असतं! ते आज न उद्या जात असतं! कशाला रडते? चल घरांत! चल घरांत! चल घरांत!’ आणि सगळ्यांना घेऊन जातो घरांमध्ये. आणि सगळे पाहुणे गेल्यावर एका कोपऱ्यामध्ये धुसफूस रडणारा तो बापंच असतो!
अरे एक बाप चार-चार, पांच-पांच पोरांना पोसण्याची धमक ठेवतो, एक बाप चार-चार, पांच-पांच पोरांना पोसण्याची धमक ठेवतो, पण चार-चार, पांच-पांच पोरं एका बापाला पोसू शकत नाही माय-बाप हो!
अरे बाप म्हणजे ज्वारीचा दाणा आहे, अरे तो स्वतःला जमीनमध्ये गाडून घेत असतो, अरे त्याच्यावरून कितीजरी संसाराचं रडगाडलं गेलं तरी एवढं मोठं कणीस देणारा तो बापच असतो! म्हणून जीवनांत एक काम करा माय-बापहो, माय-बापाची सेवा करा! दुनियामध्ये तुम्हां-आम्हांला सगळं भेटेल, माय-बाप भेटत नाही!

:- ह.भ.प. वासुदेव महाराज आर्वीकर

7 Comments