पाण्याच्या योग्य नियोजनाने केली दुष्काळावर मात….

पावसाचे प्रमाण कमी-अधिक झाले की शेतीव्यवसायावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. hivare bajarगेल्या वर्षी राज्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाला राज्याला तोंड द्यावे लागले. आता पावसाळा सुरु आहे. एकंदरीत राज्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक वाटत असले तरीही बऱ्याच ठिकाणी आजही समाधानकारक पाऊस झाला असे म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीतही शेतीव्यवसायाला नवसंजीवनी कशी द्यावी असा प्रश्न पडला असेल तर त्याकरीता हिवरेबाजार जि. अ. नगर ह्या गावाचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

इतर ठिकाणांप्रमाणे गेल्यावर्षी ह्याही गावी पावसाचे प्रमाण अत्यल्पच होते. मात्र तरीही ह्या गावातील शेतकऱ्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजनबद्ध काम करून तब्बल पांच कोटींचे उत्पन्न घेतले. इथला शेतीव्यवसाय मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. कोरडवाहू शेती असल्याने उन्हाळ्यात हातांना काम मिळणे दुरापास्त. मग येथील ग्रामस्थ उसतोडणी कामासाठी इतर जिल्ह्यात जायचे. गावात विपुल मनुष्यबळ असूनही केवळ पाण्याअभावी कामासाठी इतर जिल्ह्यात जाण्यापेक्षा सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाले तर स्थलांतराची नामुष्की गावकऱ्यांवर येणार नाही. ह्या गावातील प्रगतीशील शेतकरी पोपटराव पवार यांनी ही बाब अचूक हेरली. त्यांनी पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविला. त्याचबरोबर परिसरात वृक्षारोपणही केले. याच्या परिणामस्वरूप उन्हाळ्यातही त्यांच्या गावात मुबलक पाणी उपलब्ध होते. पावसाचे पाणी जमिनीत जीरविल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. जनावरांना विपुल प्रमाणात चारा उपलब्ध झाल्याने जनावरे चरण्यास जंगलात जाण्याची गरज पडत नाही. सर्वच मोसमात शेतकऱ्यांना पिक घेणे शक्य झाल्याने उन्हाळ्यात कामाकरिता स्थलांतर करणेही बंद झाले आहे.

हाच कार्यक्रम महाराष्ट्रातील इतर गावांमध्ये राबविला तर सिंचनाअभावी शेती पडीक राहणे तर बंद होईलच मात्र दुष्काळाची दाहकताही जाणविणार नाही. पावसाचे प्रमाण निसर्गावर अवलंबून आहे. आपण पावसाकरिता अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम काही वर्षांनंतर निश्चितच जाणवतील. त्याकरिता ह्या गावचा आदर्श घेणे निश्चितच गरजेचे वाटते.