ऑनर किलींग….सामाजिक समस्या!
| ‘ऑनर किलींग’ अर्थात जन्मदात्यांनीच आपल्या अपत्याचा खून करणे! बरेचदा यांतील अपत्य हे मुलगीच असते, किंबहुना आतापर्यंत जेवढ्या अशा घटना समोर आल्या आहेत, त्या सर्व घटनांमध्ये दुर्दैवी अपत्य हे मुलगीच असल्याचे समोर आले आहे. हा प्रसंग का ओढवतो? जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, जिचे सर्वच हट्ट, सर्वच लाड पुरविले त्या पोटच्या मुलीशीच एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे जन्मदाते का वागतात? ह्याचे प्रमुख कारण म्हणजे ती मुलगी काही महत्वाचे निर्णय आपल्या जन्मदात्यांना न पटणारे अथवा त्यांच्या विरोधात जाणारे घेते. ह्यांत प्रमुख कारण म्हणजे तिच्या लग्नासंबंधीचा निर्णय!
आज परिस्थिती बदलेली आहे. मुलांप्रमाणे मुलीही शिक्षण-उच्चशिक्षण घेऊ लागल्या आहेत, रोजगार करू लागल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रांत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना प्रगती साधू लागल्या आहेत. ह्यामुळे त्या आपले घरचे, नातेवाईक अथवा गल्लीतल्या मैत्रिणीव्यतिरिक्त कॉलेजमधल्या त्यांच्यासोबत शिकणाऱ्या अथवा सोबत काम करणाऱ्या किंवा त्यांच्या रोजच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये मिसळायला लागल्या आहेत. आता ह्या व्यक्तीतील एखाद्याला त्यांनी आपल्या भावी जोडीदाराच्या रुपात बघितले तर बिघडले कुठे? योग्य शहानिशा करून तिने केलेली निवड स्वीकारण्यास काय हरकत आहे? शेवटी तिने स्वतःच निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करेपर्यंत, स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत योग्य ते सहाय्य आपणच तिला केले ना? मग हाही निर्णय तिने स्वतः घेतला तर काय बिघडले? असा निर्णय मुलाने घेतला तर त्याला लगेच माफ करण्यात येते, मात्र मुलीने घेतला तर तिला कठोर शिक्षा, हा कुठला न्याय? स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या आजच्या पुरोगामी पिढीला हे कृत्य अशोभनीय वाटते!
ह्या घटनांमध्ये असे आढळून आले आहे की, मुलीने जोडीदार म्हणून निवड केलेला पुरुष त्यांच्या जातीतला नसतो म्हणून अशा घटना घडतात. प्रेम काय जात विचारून केले जाते का? जातीपातीमध्ये गुरफटलेली मनोवस्था बदलायला हवी! बरेचदा अशा पालकांना प्रश्न पडतो, ‘लोक काय म्हणतील? समाज नावे ठेवील, आपण प्रतिष्ठीत आहोत’ अरे लोकांचा विचार करण्याआधी जरा आपल्या मुलीचा विचार करा! आपल्या मुलीच्या जीवापेक्षाही जास्त महत्व असलेली हि कुठली ‘प्रतिष्ठा’? समाजानेही अशा मुलीकडे अथवा तिच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. शेवटी वेळ काही विचारून येत नाही. प्रत्येकाच्या घरी मुले-मुली असतात, तीही अशी वागू शकतात याचे भान असायला हवे. समाजाने दृष्टीकोन बदलला तरच ह्या घटना थांबू शकतील अन्यथा जातीच्या नावाने, खोट्या प्रतिष्ठेपायी पोटच्या पोरींची हत्या होतच राहील आणि याला जबाबदार ‘समाज’च असेल!
समाजातील एक घातक प्रवृत्ती!
Please read it and share it.