‘इग्नू’मध्ये आता ‘एमबीए इन बँकिंग व फाइनान्स’
| जर तुम्ही बँकेशी संबंधित व्यवसाय करीत असाल किंवा बँकेत नोकरी करीत असाल, ईच्छा असूनही वेळेअभावी एम.बी.ए. करणे जमत नसेल तर तुमच्याकरिता ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’ने म्हणजेच ‘इग्नू’ने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातर्फे ‘बँकिंग व वित्तव्यवस्था’ ह्या नवीन विषयातील ‘एमबीए’चा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यांत सुरु होणाऱ्या नवीन शिक्षणिक वर्षापासून सुरु होणारा हा अभ्यासक्रम बँक क्षेत्रातील व्यावसायिक आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांकरीता तयार केला गेला आहे.
ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतांना उमेदवाराने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग अँड फाइनान्सच्या (आयआयबीएफ) वतीने घेण्यात येणारी ‘सर्टिफिकेट असोसिएट’ची परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे अत्यावश्यक आहे. इच्छुक उमेदवाराला बँकिंग किंवा फाइनान्समधील किमान दोन वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
‘इग्नू’च्या वतीने ‘फाइनान्शियल मार्केट्स प्रॅक्टिस’ या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठीही अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदविकेसाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर अर्ज करू शकतात.
अभ्यासक्रमांचे माहितीपत्रक व संबंधित अधिक माहिती ‘इग्नू’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.