पाकशी चर्चेची गुऱ्हाळं थांबवून ‘जशास तसे’ उत्तर द्यायलाच हवे….

भारतावर नेहमी कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानने काल पुन्हा एक भ्याड हल्ला केला. जम्मू-काश्मीर मधील भारत-पाकिस्तान मधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळील पूंछ विभागात घुसखोरी करून भारतीय सेना दलाच्या गस्ती पथकावर हल्ला चढविला. ह्या दुर्दैची घटनेत एका सुभेदारासः पांच जवानांना वीर मरण आले.war

ह्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असला आणि संसदेतही तीव्र पडसाद उमटत असले तरीही काही प्रश्न नेहमीच अनुत्तरीतच राहतात! काश्मीर हा भारताचा ‘अविभाज्य घटक’ आहे असे आजवरचे सगळेच सत्ताधारी ‘छातीठोक’ सांगतात आणि सर्व भारतीयही हेच मानतात. असे असेल तर काश्मीरमध्ये घुसून केलेला हल्ला हा घरात घुसून केलेला हल्लाच मानला पाहिजे आणि अशा हल्ल्याला ‘जशास तसे’ उत्तर नाही दिले तर जगभर भारतीय संरक्षण दलाच्या क्षमतेवर संशय व्यक्त केला जाऊ शकतो. त्यामुळे त्यास प्रत्युत्तर तसेच द्यायला हवे.

नुसते संसदेत, सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रसार माध्यमांसमोर ‘कडे शब्दोमे’ निषेध व्यक्त करून अथवा पाकिस्तानी उच्चायुक्तांना खडसावून काही उपयोग होणार नाही. पाकिस्तानी हल्ल्यांमध्ये कमी न होता ते वाढतच जाताहेत, तरीही पाकशी ‘चर्चेची गुऱ्हाळं’ आपण कायमच ठेवतो. हिंदीत एक म्हण आहे, ‘लातो के भूत बातो से नाही मानते’ आणि पाकिस्तानने हे नेहमीच सिद्ध केले आहे. मग का आपण निषेध व्यक्त करण्यापलीकडे काही करत नाही? हल्ला करणारे पाकिस्तानी सैनिक होते की पाकिस्तानी सैनिकांच्या वेशातील अतिरेकी याच्याशी काही घेणे नाही, ते पाकिस्तानी होते हे महत्वाचे! म्हणून हा हल्ला ‘पाकिस्तानी हल्ला’च मानला जावा!

काश्मीरच नाही तर पूर्ण देशाला दहशतवादाचा धोका आहे आणि असे दहशतवादी हल्ले यापूर्वीही झाले आहेत. तपासाअंती हे सर्व हल्ले ‘पाकपुरस्कृत’ असल्याचं सिद्ध होतं, तरीही शांततेचाच मार्ग का अवलंबला जातो?

सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या नावाखाली अनेक पाकिस्तानी कलाकारांना भारतात ‘राजाश्रय’ दिला जातो. पाकिस्तानात ‘खायचे वांदे’ असलेले हे कलाकार भारतात करोडपती होतात, अमाप प्रसिद्धी मिळवितात. मात्र, पाकिस्तानात जाऊन कधी त्यांच्या देशबांधवांना भारताप्रती आदर बाळगायला शिकविल्याचे, दोन्ही देशातील नागरिकात सलोखा प्रस्थापित व्हावा याकरिता प्रयत्न केल्याचे ऐकिवात आहे? नाही! दोन्ही देशात सलोखा प्रस्थापित व्हावा ह्याकरिता क्रिकेटच्या मालिकेचे आयोजन केले जाते. अशा मालिकेला देशातून कुठे विरोध झाला तर ‘खेळात राजकारण आणता कामा नये’ अशी गुळगुळीत विधाने ऐकायला मिळतात. गेल्यावेळी तर असेच विधान ऐकायला आल्यानंतर सीमावर्ती भागात घुसखोरी करून पाकीस्तानने दोन जवानांना ठार केले. एवढेच नाही तर त्यांचे शीर कापून सोबत नेले. भारतीय जवानांची अशी क्रूर विटंबना झाल्यानंतरही क्रिकेट मालिकेचे आयोजन केले गेले.

आता एकच गोष्ट सत्य आहे. चर्चा-वाटाघाटी, सांस्कृतिक-क्रीडाविषयक देवाणघेवाण यातून पाकिस्तानी हल्ले थांबणार नाहीत आणि काश्मीर प्रश्नही सुटणार नाही. पाकिस्तानला फक्त गोळीचीच भाषा समजते. पाकिस्तानला फक्त भारतीय सैनिकच वठणीवर आणू शकतात आणि सगळे प्रश्न मार्गी लावू शकतात. त्यांना आदेशाचे बाल दिले तर ते काय करू शकतात याचा प्रत्यय भारतीय जवानांनी १९६५, १९७१ आणि १९९९ साली दिलेला आहे! आताही त्यांच्या मागे सार्थपणे उभे राहून पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे!

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या मराठा लाइफ इन्फंट्रीचे जवान कुंडलिक माने, २१ बिहार युनिटचे जवान प्रेमनाथ सिंह, शंबू सरन राय, व्ही. कुमार राय आणि रघुनंदन प्रसाद यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या परिवाराला झालेल्या दुःखात ‘m4मराठी’परिवार सहभागी आहे!

5 Comments