ब्रिटीश राजघराण्याच्या वारसासंबंधी भारतीय माध्यमांची अगतिकता

गेल्या तीन-चार दिवसांपासून एकच प्रश्न सतावत आहे. ब्रिटीश राजपुत्र विल्यम्स आणि केट मिडलटन यांचे बाळ जन्माला येणार म्हणून संपूर्ण जगातील प्रसार माध्यमे त्याकडे डोळे लावून बसले. मला जगाचे घेणे नाही, पण भारतीय प्रसार माध्यमेही यात मागे नव्हती.baby

कुणाच्या संसारवेलीवर नवीन फूल उमलत असेल तर ती नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. मात्र त्याची अधिकाधिक उत्सुकता लागते त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाइकांना. आता विल्यम्स आणि केट हे ब्रिटीश राजघराण्याचे वारसदार असल्याने त्याकडे ब्रिटनवासीय आणि तेथील प्रसार माध्यमे यांचे लक्ष लागलेले असणे स्वाभाविकच आहे. मात्र, भारतातदेखील इथली प्रसार माध्यमे रोजच्यारोज विल्यम्स आणि केटच्या बाळासंबंधी काही ना काही बातमी देत होते.

इकडे भारतात काही सारे आलबेल नाही, मग ब्रिटीश राजघराण्यातील वारसाच्या जन्मासंबंधी एवढी अगतिकता का? ब्रिटिशांनी आपल्या देशाला कमी-अधिक पाऊणे दोनशे वर्षे ओरबाडून खाल्ले ते काही कमी होते जे ते आजही आमच्या विचारांवर आणि माध्यमांवर डल्ला मारतायेत? ‘केट दवाखान्यात गेली, बाहेर आली, दाखल झाली, तिला कळा यायला लागल्या’ अरे किती ही चापलुसी? भारतात न जाणे रोज किती गरीब लोकांना भुकेमुळे रोज पोटात कळा येत असतील, कित्येक लाचार-बेघर लोक रस्त्यावरच बाळाला जन्म देत असतील त्यांचे काय?

असली भंपकगिरी करण्यापेक्षा ह्या गरीबांची दखल माध्यमातून घ्या म्हणजे प्रशासनाला जाग येईल! माध्यमे ही लोकशाहीची चौथी आधारस्तंभ आहेत, त्यांचा प्रभाव वेळोवेळी जाणवतो म्हणून काही त्यांनी हुरळून जाऊन सर्वसामान्य भारतीय जनतेचे काही देणेघेणे नसलेले विषय त्यांच्यावर बिंबवू नये! आता आज ब्रिटीश राजघराण्यात बाळ जन्माला आल्यानंतर तरी ही अगतिकता थांबेल आणि सामान्य भारतीयांच्या प्रश्नांकडे माध्यमांची नजर वळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो!

One Comment