आयपीएल 6 अंतिम सामना:- मुंबई इंडियन्स v/s. चेन्नई सुपरकिंग्ज

IPL 6आयपीएल च्या सहाव्या पर्वातील साखळी सामने, क्वालीफायर-१/२, एलीमिनेटर इ. सर्व सामने संपल्यावर आता तमाम क्रीकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे ते येत्या रविवारी कोलकाता येथे होणाऱ्या अंतिम सामन्याकडे. तशी ही स्पर्धा ‘वेगळ्या’ कारणांमुळे गाजत असली, तरीही क्रिकेटप्रेमी त्याकडे डोळेझाक करून फक्त ‘टी-२० क्रिकेट’चा थरार अनुभवत आहेत, आणि तेच क्रिकेटसाठी महत्वाचे आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात क्वालीफायर-१ जिंकून अंतिम फेरीत दाखल झालेला, दोन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघाची टक्कर क्वालीफायर-२ जिंकून अंतिम फेरीत दाखल झालेल्या, एक वेळचा उपविजेता मुंबई इंडियन्सशी असेल. ह्या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी बघता दोन्ही संघांची कामगिरी समसमान राहिली आहे. ह्या स्पर्धेत उभय संघात तीन सामने झाले. ज्यात मुंबई संघाने दोन वेळेस साखळी सामन्यांत चेन्नई संघाला नमविले. मात्र, क्वालीफायर-१च्या सामन्यात मुंबईला हार पत्करावी लागली. मात्र राजस्थानला नमवून अंतिम फेरी गाठलेला मुंबई संघ विजय मिळविण्यासाठी आसुसलेला आहे. त्यांनी दोन वेळेस चेन्नईला मात दिल्याने मनोधैर्य उत्तम आहे. अंतिम सामन्यातही चेन्नईला नमवून विजेतेपदाचा करंडक उंचावण्याचा त्यांचा मानस आहे. तर, आतापर्यंत सर्वात जास्त वेळी आयपीएलची अंतिम फेरी गाठलेला, दोन वेळेस विजेतेपद पटकावलेला चेन्नई संघ तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून आपला दबदबा कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. ह्यामुळेच अंतिम सामना उत्कंठावर्धक ठरण्याची चिन्हे दिसत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना त्रयस्थ ठिकाणी कोलकाता येथे होत असून कोणत्या संघाला प्रेक्षकांचा अधिक पाठींबा मिळतो हेही बघण्याजोगी गोष्ट असेल. कारण, ज्या टीमला अधिक पाठींबा मिळतो, त्या टीमचे मनोधैर्य चांगले राहते.