मुले आणि खेळ……

मुलांच्या जगात खेळाला अनन्यसाधारण महत्व असते. कुठलाही खेळ खेळत असतांना आपले कौशल्य पणाला लावणे, bhukनवीन कौशल्य आत्मसात करणे, योग्य रणनीती ठरविणे ह्या गोष्टी मुलांना लहानपणापासूनच आत्मसात व्हायला सुरुवात होते. चांगले कौशल्य असणारा खेळाडू पुढे जगात नावाजला जातो, तर खेळात चांगली रणनीती आखून ती आमलात आणणारा, सर्व खेळाडूंना योग्य संधी देणारा खेळाडू यशस्वी कर्णधारही होतो.

खेळ आला म्हणजे हार-जीत आलीच. एकदा पराजय पत्करल्याने खेळ कायमचा संपत नाही आणि एकदा विजय मिळविल्याने कुणी कायम अजिंक्य होत नाही! जो चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवेल तो यशस्वी होतो. जय-पराजय पचवण्याची क्षमता म्हणजेच खिलाडूवृत्ती आणि ती प्रत्येक खेळाडूच्या अंगी असणे अत्यावश्यक आहे. लहानपणापासून खेळतांना खिलाडूवृत्ती अंगी जोपासली तर तर एक चांगला खेळाडू तर तयार होतोच मात्र असा व्यक्ती चांगला खेळाडू म्हणूनही नाव कमावतो. लहानपणापासून जोपासलेली हीच खिलाडूवृत्ती पुढे त्याला प्रत्येक क्षेत्रात कामी येते.