कौन होईल मराठी करोडपती
|
प्रथम स्टार प्लस व नंतर सोनी दूरचित्रवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या, सामान्य माणसाचे करोडपती होण्याचे स्वप्न करणारा रियालीटी शो “कौन बनेगा करोडपती”च्या अफाट यशानंतर आता हाच कार्यक्रम मराठीतूनही सदर होणार आहे.
मराठीतून सादर होणाऱ्या कार्यक्रमाचे नाव आहे “कौन होईल मराठी करोडपती?” हिंदी कार्यक्रमाच्या यशाचे गमक कार्यक्रमाचे स्वरूप तर होतेच, मात्र ह्या कार्यक्रमाच्या सूत्र संचालनाची जबाबदारी दिग्गज हिंदी सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या वैशिष्टपूर्ण शैलीत पार पाडली, जे प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरले. आता मराठीत e-टीव्ही मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आघाडीचे मराठी कलाकार सचिन खेडेकर हे करत आहेत.
सामान्य ज्ञानावर आधारीत पर्यायी प्रश्नसंचाचे स्वरूप असलेला हा खेळ आहे. ज्यात भाग घेतलेल्या स्पर्धकाला एक प्रश्न विचारला जातो, ज्यात बक्षिसाची रक्कम पाच हजारापासून सुरु होते, तर जास्तीत जास्त पाच करोड रुपयांपर्यंत ही रक्कम जिंकू शकतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे चार पर्याय दिलेले असतात. त्यातून योग्य उत्तर द्यावे लागते. जर एखादा प्रश्न अडला तर त्यासाठी चार “जीवनदायिनी”देखील उपलब्ध असतात. स्पर्धक योग्य उत्तरे देत गेलं तर करोडपती होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते.