लग्नसराई

‘लग्नसराई’ बहुदा उरकत आली आता! हल्ली लग्नसराईत खूपच ‘आधुनिकपणा’ आलेला दिसतो, lagnaमात्र जुने दिवस आठवले की आजही तेच दिवस पुन्हा यावेत असे वाटते. पूर्वी ‘दारासमोर’ लग्न काढणे म्हणजे मोठी ‘भूषणावह’ गोष्ट वाटायची! आता दारासमोर लग्न काढायला ह्या सिमेंटच्या जंगलात जागाच कुठे उरलीय?
आता महागड्या ‘लॉन्स’वर लग्न काढायची क्रेझ आलीय. ‘संबळ’ तर आता लग्नातून हद्दपारच झालाय! लहान असतांना मोठया माणसांना ‘संबळ’च्या तालावर ‘विशिष्ट पद्धतीने’ नाचतांना बघायला खूप मज्जा यायची, मग आम्हीपण शिकलो ‘त्या’ तालावर ठेका धरायला! आता मात्र डी.जे.वर एखादया ठिकाणी संबळची रेकॉर्डिंग ऐकायला मिळते.
मित्रपरिवारात लग्न म्हटले म्हणजे पत्रिका वाटण्यापासून सामानाची जमवाजमव करणे ते लग्नातील जेवणावळीत वाढण्यापर्यंत सर्वच कामात उत्सुर्फ सहभाग. लग्न मित्राच्या बहिणीचे असेल तर मग जरा जास्तच मेहनतीची तय्यारी! आता मात्र लग्नपंगतीत वाढायची हौस देखील पूर्ण होत नाही! ‘केटरर्स’ आलेत ना! त्यांना कंत्राट दिले, की झाले आपले काम! लग्नातल्या जेवणावळीत मेनूही मर्यादित आणि ठरलेले असायचे. वरण-भात, उस्सळ, बुंदी अथवा जिलेबी, मसाले भात. ‘कार्या’चा स्वयंपाक तो कार्याचाच, त्याची चव घरी मिळणारच नाही असे म्हणून कितीही गर्दी असली तरीही जेवणावर ताव मारल्याखेरीज तेथून हटायचे नाही असा दंडकच होता!
आता मात्र मेनूही बदलले आणि त्यांची संख्याही! काही ठिकाणी तर ‘इतके’ मेनू असतात की, ते बघूनच पोट भरून जातं! हे खावं की ते खावं हेच कळत नाही! जणू जेवणावळीत आलो नसून एखादया हॉटेलातच मेनू ‘सिलेक्ट’ करत आहोत याचा आभास होतो! बरेच रीतीरीवाजाही मागे पडत चाललेले दिसतात! एकंदर काय, प्रगती झाली. आपण बदललो, जुनं मागे पडलं, नवीन ते स्वीकारलं! मात्र, तरीही जुन्याची ओढ काही केल्या सुटत नाही! नाही म्हणायला ग्रामीण भागात अथवा एखादया गरीबाच्या कार्यात ‘जुन्या’चा अनुभव येतोच, आणि तिथेच मन सुखावतं!

2 Comments