टी.व्ही. वरील मालिकांमधील हरविलेली मुल्ये
| वर्तमानपत्र चाळत असतांना वाचकांच्या प्रतिसादावर नजर फिरविली, एका वाचकाने टी.व्ही.वर दाखविल्या जाणाऱ्या मालिकांतील प्रसंगांवर आक्षेप नोंदविला होता. आजकालच्या मालिका संस्कारहीन, अपप्रवृत्तींना उत्तेजन देणाऱ्या असल्याचे मत नोंदविले होते. पूर्ण वाचल्यानंतर मलाही त्यांत तथ्य आढळले. टी.व्ही.वरील मालिकांमध्ये भावा-भावातील विकोपाला जाणारे वाद, विवाहबाह्य संबंध, वारंवार जोडीदार बदलणे, एखाद्याचा बदला घेण्यासाठी कुठल्याही स्तराला जाणे असे प्रसंग दाखविले जातात. समाजात अपप्रवृत्तींचा प्रचार करणारे असे प्रसंग दाखवून कुठली क्रांती ह्या मालीकावाल्यांना करायची आहे? असे प्रसंग दाखविल्याने प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश जातो. हिंसा, स्त्रीकडे वाईट दृष्टीने बघण्याच्या प्रवृत्तीला चालना मिळते.
मालिकांत दाखविलेली एकत्र कुटुंबे म्हणजे अंतर्गत शह-काटशहाने बरबटलेल्या राजकीय पक्षांसारखेच चित्र उभे केलेले असते. एकतर ह्या कुटुंबातील लोक एकमेकांशी भांडतात किंवा दुसरा कुणीतरी त्यांच्यात भांडणे लावतो. याउलट, सुखी-समाधानी, एकमेकांना आधार देत प्रगती साधणारी एकत्र कुटुंब ह्या मालिकांमधून दाखविली तर समाजावर चांगले संस्कार तरी होतील. आजकाल समाजात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन दुषित होत चाललेला दिसतो आहे. बलात्कार, छेडछाड, स्त्रीभ्रूण हत्या असले प्रसंग रोजच कानावर येतात. टी.व्ही.वरील मालिकांना प्रेक्षकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता ह्या घटना रोखण्यासाठी प्रोत्साहन देणारी कथानके ह्या मालिकातून दाखवायला हवीत. राष्ट्रीयत्व जपणारी, मूल्यांना उत्तेजन देणारी संस्कारक्षम कथानके दाखवायला हवीत. अशी कथानके आजच्या बदलत्या परीस्थितीत निश्चितच क्रांती करणारी ठरू शकतील!