एक तारा निखळला : प्रसिद्ध विनोदी अभिनेते सतीश तारे कालवश

    मराठी नाट्यसृष्टी तसेच सिनेसृष्टीतील एक विनोदी ‘तारा’ प्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांचे आज दुःखद निधन झाले.satish_tare मधुमेह आणि त्यातच त्यांच्या पायाला गँगरीन झाल्याने गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यातून त्यांची सुटका होऊ शकली नाही आणि त्यातच त्यांची आज दुपारी १२.०५ वा. जुहु येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली.
            सतीश तारे आपल्या कसदार अभिनयामुळे सुपरिचित होते. मराठी रंगभूमीवरील एक ‘हरहुन्नरी’ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि छोटा पडदा अशा सगळ्याच क्षेत्रात आपल्या विनोदी अभिनयाने अस्तित्व सिद्ध केले होते. अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि गायन अशा चार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवून त्यांनी आपल्यातले अष्टपैलुत्व सिद्ध केले होते. ‘सारेगम’ मधून त्यांनी आपल्यातल्या गायकाचे दर्शन घडविले होते. झी मराठी वरील ‘फू बाई फू’ ह्या विनोदी रियालिटी शो मध्ये एकाहून एक धमाल विनोदी अभिनय सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. ‘मोरूची मावशी’ ह्या विनोदी नाटकाची नव्या रूपांत पुनर्निर्मितीही त्यांनी केली होती व त्यात त्यांनी स्वतः ‘मावशी’ची भूमिका बजावली होती. ‘आपले ठेवा झाकून’ ह्या नाटकामुले त्यांचा निर्मात्यांशी वाद झाला होता त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता.
            सध्या त्यांचे ‘गोडगोजिरी’ हे नाटक रंगभूमीवर सुरु होते. ह्या नाटकाच्या काही प्रयोगातही त्यांनी भाग घेतला होता मात्र आजारामुळे त्यांना मधेच ह्या नाटकातून तात्पुरते बाहेर जावे लागले होते. त्यांचे हे तात्पुरते बाहेर जाणेच ‘कायमचे जाणे’ ठरले. 
            सतीश तारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 

2 Comments