आजची तरुणाई……!

हल्लीचे तरुण आपल्या दिसण्याकडे जरा जास्तच लक्ष देतात. Youthपुर्वीचेही द्यायचे, मात्र ते यासाठी आजच्या तरुणांइतके आग्रही नसायचेत. आज आपल्या ‘असण्या’पेक्षा ‘दिसण्या’कडे तरुणांचा कल वाढलेला दिसतो. आजच्या तरुणींमध्ये चित्रपट-मालिकांमधील नट्यांची नक्कल करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. ह्या नट्यांची केशरचना, मेकअप, कपडे, शूज लगेच कॉपी केले जातात. सगळ्यांचा आपल्या चांगल्या दिसण्यावर भर असतो. पूर्वीच्या मुली कॉलेजला जातांना साडी नेसायच्या, नंतर सलवार-कामिजचा काळ आला जो आजही टिकून आहे, मात्र त्यात भर पडली वेस्टर्न लुक असलेल्या कमीज आणि जीन्सची. एखादी मैत्रीण जरा जुन्या पद्धतीचे कपडे वापरत असेल किंवा साधी सरळ केशरचना अथवा साधे राहणीमान असेल तर लगेच तिला कालबाह्य आणि काकूबाई ठरवलं जातं!

मुलंही यात मागे नाहीत! आताची मुलं जिममध्येच जास्त मिळतात. शरीर कमावणे ही चांगली गोष्ट आहे, मात्र, इथे फक्त शरीर कमवण्या किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी नाही तर ‘माचो’ लुक दिसण्यासाठी जिममध्ये जाणारे आहेत! फीट जीन्स, फीट टी-शर्ट घालून आपली डौलदार शरीरयष्टीचं दर्शन घडवल जातं. टीव्हीवरील जाहिरातींमध्ये दाखवली जाणारी क्रीम्स, परफ्युम्स मिळवण्याकडे त्यांचा जोर असतो!

थोडक्यात काय तर आजच्या तरुणांचा असा (गैर?)समज आहे की, जर तुम्ही चांगले दिसाल तरच लोक तुमची दखल घेतील नाहीतर तुमच्याकडे त्याचं साफ दुर्लक्ष होईल आणि चांगलं दिसण्यासाठी ह्या सर्व गोष्टी करायलाच लागतील. पण ह्या सर्वांपेक्षा कितीतरी अधिक महत्वाचं आहे ते तुमचं चांगलं असणे! लोकांनी तुमचे दिसणे नाही तर तुमचे वागणे-बोलणे, तुमचे गुण, तत्व यांच्यामुळे तुम्हाला ओळखायला हवे आणि हीच ओळख तुम्हाला त्यांच्या चिरकाळ स्मरणात ठेवेल!

One Comment