MPSC परीक्षेच्या तारखेचा नवीन घोळ….
| एम.पी.एस.सी. परीक्षांचा घोळ संपता संपत नाहीये! आधीच सर्व्हर क्रॅश झाल्याने डेटा करप्ट झाल्यामुळे अनेक परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला होता, त्यात आता परीक्षेच्या तारखेचा नवीन घोळ निर्माण झाला आहे! येत्या २५ रोजी होणाऱ्यापरीक्षेचे ‘प्रवेश पत्र‘ परीक्षार्थींना प्राप्त होऊ लागले आहेत. मात्र, ह्या प्रवेश पत्रावर परीक्षेचा दिनांक ‘शनिवार, २५ ऑगस्ट २०१३‘ असा उल्लेख आहे. गम्मत म्हणजे २५ ऑगस्ट शनिवारी येत नसून रविवारी येते. त्यामुळे परीक्षा नेमकी शनिवार २४ ऑगस्टला की रविवार २५ ऑगस्टला असा संभ्रम परीक्षार्थींना सतावत आहे.
दरवर्षी अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या मार्फत आपले नशीब आजमावत असतात. ह्या परीक्षांकरिता विद्यार्थी वर्षभर कठोर परिश्रम घेऊन तयारी करतात. मात्र, महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाच्या अशा गलथान काभारामुळे ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे परीक्षार्थींचे मनोधैर्य खच्ची होऊन गुणात्मक नुकसान होण्याची भीतीही नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे आयोगाने आपल्या कारभारात सुधारणा आणून पारदर्शकता आणावी. तसेच परीक्षार्थींच्या मनात संभ्रम निर्माण होईल असे वातावरण तयार होणार नाही याची काळजी घ्यावी. होऊ घातलेली परीक्षा नेमकी कुठल्या दिवशी आहे याचा खुलासा आयोगाने त्वरित करावा आणि परीक्षार्थींमधील संभ्रम दूर करावा.