मुंबई इंडियन्स चा सामना आज राजस्थान रॉयल्सशी….
|इंडियन प्रीमियर लीग च्या सहाव्या पर्वातील साखळी सामने अखेरच्या टप्प्यात आले असून पहिल्या तीन क्रमांकात चुरस बघण्यास मिळत आहे. १५ पैकी ११ सामन्यात विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्ज अव्वल स्थानी आहे, तर मुंबई इंडियन्स १४ पैकी १० सामन्यात विजय मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सनेदेखील १४ पैकी १० सामन्यात विजय मिळविला आहे मात्र सरस धावगतीमध्ये मुंबईच्या संघापेक्षा ते कमी पडले म्हणून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. १५ पैकी ८ सामन्यात विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू चौथ्या क्रमांकावर आहे.
त्यातच आज मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचं मुकाबला करेल. हा सामना मुंबईने जिंकला तर ते अव्वलस्थानी जातील तर राजस्थानने विजय मिळविल्यास त्यंना दुसऱ्या क्रमांकावर जाता येईल. म्हणूनच ह्या सामन्यात चुरस पहावयास मिळेल. आयपीएलच्या चाहत्यांचे ह्या सामन्याकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. मुंबई आणि राजस्थान यांच्यातील मागच्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला असून तो सामना जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडीयम मध्ये खेळविण्यात आला होता. आता मात्र ते घरच्या वानखेडे स्टेडीयमवर राजस्थानचा मुकाबला करतील. त्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा पाठींबा लाभणार आहे. मुंबईच्या हैदराबादविरुद्धच्या गतसामन्यात केविन पोलार्डने तुफान फटकेबाजी करीत आपल्या संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला होता, त्यामुळे ह्या सामान्यात देखील प्रेक्षक पोलार्डकडून फटकेबाजीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.