मटण बिर्याणी
|साहित्य :–
१) एक किलो मटणाच्या मोठया फोडी
२) अर्धा किलो बासमती तांदूळ
३) अर्धा किलो कांदे पातळ उभे चिरलेले
४) तीन ते चार बटाट्याच्या मोठया फोडी
५) १०० ग्रॅम जर्दाळू , दोन मिरच्या
६) कोथिंबीर , आले-लसूण गोळी वाटून
७) अर्धा वाटी ओले खोबरे
८) एक चाथुर्थांश वाटी पुदिना
९) अर्धा वाटी दही , दोन वाटया तूप
१०) दोन लिंबाचा रस , अर्धा टी स्पून केशर
११) अर्धा टेबल स्पून पिवळा रंग
१२) केवडा पाणी किंवा केवडा इसेन्स
१३) तीन चाथुर्थांश चमचा हळद , तीन चमचे तिखट
१४) मीठ , गरम मसाला , चार ते पाच लवंगा
१५) चार तुकडे दालचिनी , पंधरा ते वीस मिरी
१६) एक टी स्पून गोड जिरे , एक चमचा शहाजिरे
१७) एक चमचा खसखस , ४ ते ५ मसाला वेलची
१८) २ जायपत्री , अर्धा जायफळ , २ ते ३ तमालपत्र .
कृती :-
१) आले-लसूण गोळी वाटणे . एक कांदा बारीक चिरून त्यात ओले खोबरे , कोथिंबीर , पुदिना , मिरची टाकून गोळी वाटणे .
२) सर्व गरम मसाला सुका भाजून त्याची पूड करून ठेवणे . कांदे पातळ चिरून तुपात कुरकुरीत तळून काढून ठेवणे .
३) बटाट्याच्या फोडींना हळद , तिखट , मीठ लावून कांदयानंतर तुपात तळून ठेवणे .
४) लिंबाचा रस काढून त्यात गरम करून बारीक केलेले केशर टाकून त्यातच केवडयाचे पाणी एक चमचा किंवा केवडा इसेन्स १/४ चमचा टाकावा .
५) टोमाटो बारीक चिरून ठेवावा . जर्दाळू गरम पाण्यात नरम करून मटण शिजल्यावर त्यात टाकावे .
६) कांदा-बटाटा तळल्यानंतर त्याच तुपात टोमाटो टाकून परतावा व मग मटण टाकावे .
७) नंतर आले-लसूण गोळी टाकून परतावे व कांदा-खोबऱ्याची गोळी टाकावी . नंतर दही , हळद , तिखट , मीठ टाकून मटण शिजू दयावे .
८) शिजल्यावर कुटलेला गरम मसाला टाकावा . त्यातला थोडा भातावर टाकायला ठेवावा .
९) लिंबू-केशराचे अर्धे पाणी टाकावे व मटण सुके करून ठेवावे . तळलेला कांदा कुस्करून मटणात शेवटी टाकावा व परतावे .
१०) मोठया पातेल्यात तांदळाच्या चौपट पाणी ठेवून भात अर्धा कच्चा शिजू दयावा किंवा अर्धा कच्चा शिजल्यावर पाणी काढून टाकावे .
११) भात शिजताना एक चमचा मीठ टाकावे . लवंग-दालचिनी , मोठी वेलची , तमालपत्र भात शिजताना थोडे थोडे टाकावे .
१२) भात झाल्यावर त्यात थोडा तळलेला कांदा कुस्करून टाकावा व अर्धा चमचा गरम मसाला टाकून लिंबू व पिवळा रंग टाकावा .
१३) भाताच्या पाण्यातच रंग टाकला तरी चालेल . लिंबाचा रस व केशर पाणी व केवडा पाणी अर्धा चमचा भातात टाकावे .
१४) मोठया पातेल्यात अर्धी वाटी तूप गरम करून घ्यावे . त्यात तळाला थोडासा भात टाकून वर सर्व मटण टाकावे व मटणावर भाताचा थर लावावा .
१५) थोडे तूप गरम करून भातावर बाजूने व मधे सोडावे व वर घट्ट झाकण ठेवून खळीने बंद करावे . ओव्हनमध्ये अथवा गैसवर तवा ठेवून त्यावर पातेले ठेवून वाफ आणावी . बिर्याणीवर कोथिंबीर टाकावी .
१६) एक काकडी , एक टोमाटो , एक कांदा , एक मिरची , कोथिंबीर व पुदिना बारीक चिरून सर्व एकत्र करावे . घट्ट दह्यात मीठ व वरील सर्व पदार्थ टाकून मिक्स करावे .