दहशतवादाच्या सावटाखालील राष्ट्रीय सण…..
|भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व यंत्रणा आगामी स्वातंत्र्यदिन ‘सालाबादप्रमाणे’ साजरा करण्याच्या दृष्टीने कामाला लागली असतांनाच ‘सालाबादाप्रमाणे’च राजधानी दिल्लीत अतिरेकी हल्ल्याच्या शक्यतेने ‘रेड अलर्ट’ही घोषित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ‘युद्धबंदी’ मोडून झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्या पांच भारतीय जवानांच्या घटनेचे समर्थन करत लाहोर येथील गद्दाफी स्टेडीयम येथे ‘खुले-आम’ केलेल्या भाषणात ‘लष्कर-ए-तोयबा’ चा म्होरक्या हाफिज सईद याने दिल्लीतील लाल किल्ल्यावरही हल्ला करण्याची धमकी दिली.
दरवर्षी अशा धमक्या दिल्या जातात अथवा हल्ल्याची शक्यता वर्तविली जाते आणि स्वातंत्र्यदिन असो वा प्रजासत्ताक दिन, काहीशा दहशतवादाच्या सावटाखालीच साजरा केला जातो. पुर्वी लालकिल्ल्याच्या प्राचीवरून राष्ट्रपती वा पंतप्रधान ‘खुलेआम’ राष्ट्राला उद्देशून भाषण करायचे, आता मात्र बुलेटप्रुफ काच आणि सुरक्षारक्षकांनी घेरलेल्या अवस्थेत भाषण करतांनाचे केविलवाणे दृश्य नजरेस पडते. काही संवेदनशील शहरांना तर लष्करी छावणीचेच रूप प्राप्त होते. अशा कशिश भीतीच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन अथवा प्रजासत्ताक दिन साजरा करणे म्हणजे नामुश्कीजानाकच वाटते! कधी ही परिस्थिती बदलेल देवच जाणो?