आता श्रीशांतच्या आयुष्यावरही बनणार चित्रपट….

sreesanthभारतीय लोकांवर चित्रपटांचा विशेष प्रभाव जाणवतो. हेच कारण असेल कदाचित की, एखादया मोठया घटनेनंतर त्या घटनेवर अथवा घटनेत सामील व्यक्तींच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी चित्रपट निर्माते उत्सुक असतात. मग ती घटना २६/११चा दहशतवादी हल्ला असो वा पोलीस आणि गुंडादरम्यान चकमक. दैनिक ‘सकाळ’च्या संकेत स्थळावर प्रसारित झालेल्या बातमीनुसार नुकत्याच उघडकीस आलेल्या आयपीएल च्या ६व्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेला खेळाडू एस. श्रीशांतच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविला जातोय. ‘क्रिकेट’ नाव असलेल्या ह्या चित्रपटाची निर्मिती “एकलव्य’ आणि “माफिया’ फेम दिग्दर्शक शाजी कैलास आणि ए के. साजन हे करणार आहेत. चित्रपटाच्या निर्मितीविषयी बोलतांना सहजी कैलास यांनी सांगितले की, एका छोट्याश्या शाळेतून आलेल्या एका अष्टपैलू मल्याळी क्रिकेटपटूच्या आयुष्यातील चढ-उतार ह्यांची ही कथा आहे. जो कर्तृत्व, परिश्रम आणि नशिबाच्या जोरावर यशोशिखरावर पोहोचतो, मात्र ऐन प्रसिद्धीच्या झोतात असतांनाच नकळत काही चुकीचे निर्णय घेतो, आणि त्याची जबर शिक्षा त्याला भोगावी लागते. आजच्या तरुणाईकडून ध्येयपूर्तीसाठी नकारात्मक मानसिकतेचा वापर कशा प्रकारे होतो यावर हा चित्रपट आधारलेला असेल असेही साजन म्हणाले.