पाकातल्या पुऱ्या
|१) एक वाटी रवा
२) पाऊण वाटी मैदा
३) दही वा दाट ताक
४) पाकासाठी तीन वाटया साखर
५) थोडे केशर , तळण्यासाठी तेल
६) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) रवा-मैदा , साखर एकत्र करून त्यात गरम तेलाचं मोहन घालावं . दही वा ताकात घट्ट भिजवावं . (आवश्यकता वाटल्यास थोडं पाणी चालेल .)
२) अर्धा तास तरी झाकून मग कुटावं . छोटया छोटया पुऱ्या लाटाव्यात . (शक्यतो एका पुरीचा एक घास अशा) .
३) एकदा तेल कडकडीत गरम केल्यावर मंद आचेवर पुऱ्या तळाव्यात . कडक हव्या , मऊ नकोत .
४) एकीकडं साखर बुडेल एवढं पाणी घालून पाक करावा . त्यात किंचित गरम केलेलं केशर कुस्करून घालावं .
५) मंद आचेवर (एका निखाऱ्यावर म्हणतो तसा) पाक गरम ठेवावा .
६) चार-पाच पुऱ्यांचा पहिला घाणा तळून काढल्यावर त्या पुऱ्या पाकात टाकाव्यात .
७) तोपर्यंत दुसरा घाणा तळायला घ्यावा . पाकातल्या पुऱ्या उलटाव्या .
८) दुसरा घाणा तळून झाला की पाकातल्या पुऱ्या काढून परातीत वा थाळ्यात सुट्या सुट्या ठेवाव्या आणि पाकात तळलेल्या पुऱ्या टाकाव्या .
९) थाळ्यातल्या पुऱ्यांतून पाक निथळतो टो पुन्हा पातेल्यातल्या पाकात टाकावा .
१०) पातेल्यातला पाक घट्ट झाल्यास किंचित पाणी घालून उकळी आणावी .
११) सरतेशेवटी उरलेल्या पाकात बदाम-काप , बेदाणे , लिंबूरस घालून सुधारस करता येतो . मात्र पुऱ्या बुडेल इतका पाक कायम लागतोच .
१२) या पुऱ्यांचा पसारा खूप होतो . आचेवरील तळणीमुळं वेळही जास्त लागतो . पण खाणाऱ्यांच्या पसंतीनंतर शीण जाणवत नाही .
(खास न्याहरीची तयारी म्हणून आदल्या दिवशी या पुऱ्या करून ठेवता येतात .)