अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या जाहिराती

काही वाहिन्यांवरील भविष्यकथन करणारे कार्यक्रम अथवा वेगवेगळे मंतरलेले ‘पेंडंट’च्या जाहिराती बघितल्या की वाटत  ‘आपण खरोखर एकविसाव्या शतकातच वावरतोय ना?’

pendant_advertisementsयाविषयी शंका येते. कुठलाही नवीन बदल त्वरीत स्वीकारणारी भारतीय मनोवृत्ती आहे. त्यामुळेच वर्षानुवर्षे रूढी-परंपरांच्या जोखडात अडकलेल्या आचरणशैलीतून बाहेर येऊन आपण अनेक सुधारणा आत्मसात केल्या. तरीही वारंवार एकाच गोष्टीचा भडीमार मनावर झाला की आपण लगेच त्या गोष्टीकडे आकृष्ट होतो आणि कुतूहल म्हणून ती गोष्ट करून बघतो अथवा विकत घेतो.

हाच धागा पकडून वेगवेगळी उत्पादने काही उत्पादकांनी बनविली आहेत. आता पैसा कमावणे याचा संबंध मेहनतीशी की गळ्यात एखादे लॉकेट घालण्याशी? अशा उत्पादनांचा प्रसार करून आपण प्रामाणिक मेहनतीवर शंकाच उत्पन्न करतो. अशाने प्रामाणिक प्रयत्न करूनही अपेक्षित यश न मिळालेले लोक आपसूक अशा उत्पादनांकडे आकृष्ट होतात आणि हेच त्या उत्पादकाला अभिप्रेत असते. अशाने मात्र त्या व्यक्तीचा मेहनत करण्यावरील विश्वास डळमळीत होतो हे नक्की. असे एखादे लॉकेट घातल्याने खरोखर कुणी श्रीमंत होत असता तर भारतात गरीबी एवढी वाढली नसती!

अशाच काही वाईट नजरेपासून वाचविणाऱ्या अपघातांना-आजारांना दूर ठेवणाऱ्या यंत्र-लॉकेट-पेंडंट-ब्रेसलेटच्या जाहिरातींचा नेहमी भडीमार होत असतो. अशा गोष्टी वापरल्याने अपघात अथवा आजार दूर राहतात असा समज होऊन त्या गोष्टी वापरल्याने निष्काळजीपणामुळे एखादा दुर्दैवी प्रसंग घडला तर त्यास जबाबदार कोण? भूतकाळातील अनुभव आणि त्यानंतर ह्या पेंडंट’ चा वापर करून झालेले बदल सांगायला खूप सारे कलाकार असतातच आणि इतर लोकांना याचा फरक पडला किंवा त्यांची परिस्थिती बदलली म्हणून आपली ही बदलेल असा समज निर्माण होतो. अशाने विनाकारण अंधश्रद्धेला खतपाणी मिळते. खरच अश्या वेळी आणि दिवसागणिक वाढणाऱ्या ह्या जाहिराती बघून वाटत की अंध श्रद्धा निर्मुलन समितीला नसतील का दिसत .

अशा गोष्टींची जाहिरात करतांना देवाचे नाव वापरून आपले उत्पादन खपविण्याचा प्रयत्न करणेही चुकीचे आहे. कारण, ते उत्पादन वापरून अपेक्षित परिणाम नाही जाणविला तर उगाच देवालाही दोष देण्याचे प्रकार घडतात आणि देवाविषयी गैरसमजही पसरतात. देवावर श्रद्धा जरूर ठेवावी मात्र ती अंधश्रद्धा नसावी हे महत्वाचे आहे. देव त्याच लोकांना साथ देतो जे लोक मेहनत करण्यावर विश्वास ठेवतात.

 

2 Comments