अभियांत्रिकीच्या जागा रीक्त राहण्यामागचे कारण

सकाळी पेपर वाचता-वाचता एका बातमीने लक्ष वेधून घेतले.engneering ‘अभियांत्रिकीच्या ५० हजार जागा रिक्त”, मला तर धक्काच बसला! पुर्वी पहिल्या फेरीत प्रवेश नाही मिळाला तर अभियांत्रिकीला प्रवेश मिळविण्याकरिता उमेदवार दुसऱ्या, तिसऱ्या…अखेरच्या फेरीपर्यंत वाट बघायचा, कित्येक विद्यार्थ्यांना तर नंबर न लागल्यामुळे हिरमुसले व्हावे लागायचे. आणि आता चक्क जागा रिक्त? मुलांचा अभियांत्रिकीकडे जाण्याचा कल कमी झालाय का? असा प्रश्न पडला. मात्र तसेही नाही. समाजात वावरतांना सहज दृष्टीस पडतं की इतर कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. मग एवढ्या जागा रिक्त राहण्याचे कारण काय असेल?

सध्या सगळीकडे शिक्षणसम्राटांचे वर्चस्व वाढलेले दिसते. जो तो उठ-सुट शिक्षण संस्था काढतो. राजकारणीच नाही तर व्यावसायिक, उद्योगपतीही यात मागे नाहीत. अभियांत्रिकीच नाही तर, व्यवस्थापन, अध्यापन शाखेच्या महाविद्यालयातही भरमसाट वाढ झालेली आहे. ह्या महाविद्यालयात भरमसाट डोनेशन्स देवून प्रवेश मिळतो. तिथल्या सोयीसुविधांमुळे विद्यार्थ्यांचा कलही अशा महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडेच अधिक असतो. अशा महाविद्यालयांच्या संख्येवर सरकारने कुठलेही नियंत्रण ठेवल्याचे सध्या दिसत नाही. कारण, पुर्वी ज्या शहरात एखादेच अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाविद्यालय होते, अशा शहरात आता पाच-सहा महाविद्यालय दृष्टीस पडतात. भविष्यातील अभियंत्यांची गरज लक्षात न घेता फक्त डिग्री देणारे कारखानेच ह्या महाविद्यालयांच्या रूपाने उघडली आहेत. आणि हे फक्त अभियांत्रिकीपुरताच आहे असे नाही, तर बी.एड., डी.एड, च्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. म्हणूनच मी तर म्हणेन की, अभियांत्रिकीच्या इतक्या जागा रीक्त राहण्यामागे अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला असे नाही, तर अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ हेच मुख्य कारण आहे!