उत्तराखंडातील परेस्थितीस तेथील ‘वृक्षतोड’ जबाबदार
|उत्तराखंड राज्यांत पावसामुळे झालेल्या प्रचंड हानीस तेथील वृक्षतोड जबाबदार असल्याचे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे. उत्तराखंड मधील बराचसा भाग डोंगराळ आहे. ह्या डोंगराळ भागातच प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झालेली असून बरीच बांधकामेही झालेली आहेत. हीच पावसामुळे झालेल्या हानीची कारणे असल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहे.
उत्तराखंड मध्ये पूरस्थिती निर्माण होणे अथवा दरडी कोसळणे ह्या घटना नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांत ह्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. उत्तराखंडमधील अनेक भागांशी संपर्क तुटला असून, मृतांची संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी, केदारनाथ, गौरीकुंड, रामबाबा आणि रुद्रप्रयाग या ठिकाणी पूर, जोराचा पाऊस व दरडी कोसळल्यामुळे मोठा फटका बसला आहे.
उत्तराखंडमध्ये अनेक जलविद्युत प्रकल्प आणि खाणकामे चालू आहेत. ही कामे करताना उडविण्यात येणाऱ्या सुरुंगांमुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार २०११-१२ मध्ये उत्तरकाशीत आपत्ती येण्यात असिगंगा जलविद्युत प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. येथे धरण बांधण्यासाठी सातत्याने सुरुंग उडवण्यात येतात. त्यामुळे नदीमधिल गाळ वाढत असून, पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत आहे.