साधा डोसा

साहित्य :-dosa

१)      अर्धी वाटी उडीद डाळ

२)     एक वाटी जाडे तांदूळ

३)     एक वाटी उकडा तांदूळ

४)     दहा-बारा मेथीदाणे

५)    चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      डाळ-तांदूळ कमीतकमी सात-आठ तास एकत्र भिजत घालावं .

२)     गुळगुळीत वाटून घ्यावं .  इडलीच्या पिठापेक्षा हे पीठ थोडं पातळ असलं तरी चालेल .

३)     थोडं मीठ घालून , झाकून उबदार जागी फुगत ठेवावं .  सकाळी पीठ फुगलं की चांगलं ढवळून घ्यावं .

४)     डोसा करतेवेळी पीठ पळीनं घोटून घ्यायचं .  गरज वाटल्यास थोडं पाणी घालायचं .  एका वाटीत तेल आणि दुसऱ्या वाटीत पाणी तयार ठेवायचं .

५)    बीडचा तवा असेल तर तो तापल्यावर पेपर नैपकिनला तेल लावून तवा पुसून घ्यायचा .  मग तवा पुरेसा तापला , की नाही हे बघण्यासाठी त्यावर पाणी शिंपडायचं .  गैस मात्र मोठाच हवा .

६)      पाणी झटकन वाफ होऊन नाहीस झालं , की एक डावभर पीठ मध्यभागी ओतायचं आणि डावाच्या तळानं किंवा वाटीच्या तळानं पीठ भराभर गोलाकार पसरायचं .

७)    ही कृती सवयीनं भराभर करता येते .  बाजूनं तेल सोडायचं .  डोसा कुरकुरीत होतो .  दुसऱ्या बाजूनं करायची गरज नाही .  त्यानंतर प्रत्येक वेळी पाणी शिंपडायचं , पाणी नाहीस झालं की पीठ पसरायचं आणि तेल सोडायचं .