गाडी चालवीत असतांना ‘सावधान’!
| मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. सहज विषय निघाला, ‘अपघातांचा’! दचकले ना? जो तो त्यांनी पाहिलेले अथवा ऐकलेले अपघात सांगत होता. एकाने नुकताच काही दिवसांपूर्वी झालेला अपघात सांगितला. कुठल्याशा मोबाईल कंपनीत नोकरीला असलेला एक युवक हाय-वे वर दुचाकी चालवितांना कानात हेडफोन लावून बोलत होता, त्यामुळे मागून येणाऱ्या डंपरच्या हॉर्नचा आवाज त्याला ऐकू आला नाही. तितक्यात त्याच्या कानातून हेडफोन निसटला तो एका हाताने पुन्हा लावण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो डंपरच्या मागील चाकाखाली आला. त्याच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला.
मला प्रश्न पडतो की कितीही महत्वाचे काम असले तरीही गाडी चालवितांना मोबाईल वर बोलणे आवश्यक आहे का? विशेषतः कार्पोरेट कंपनीत काम करणे कर्मचारी गाडी चालवितांना अथवा काहीही करतांना सारखे मोबाईलवर बोलत असतात. मात्र हीच गोष्ट जीवावर बेतणारी ठरू शकते. एकतर डोक्यावर हेल्मेटही नसते. हेल्मेट ओझे वाटत असले तरीही हाय-वे वर दुचाकी चालवीत असतांना हेल्मेटचा वापर करायलाच हवा. हेल्मेट नेहमी वापरले तर उत्तमच! गाडी चालवितांना फोनवर बोलणे टाळावे. चित्रपटाची अथवा इतर जाहिरातींची पोस्टर्स रस्त्याच्या दुतर्फा असतात. रस्त्याने जातांना ही पोस्टर्स सहजच लक्ष वेधून घेतात. मात्र गाडी चालवितांना अशा पोस्टर्सकडे बघत गाडी चालविणेदेखील धोक्याचे ठरू शकते. वेग नेहमी मर्यादित ठेवावा. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. ह्या दिवसांत बरेचदा गाडीचा ब्रेक लागत नाही, त्यामुळे ब्रेक तपासून घेणे आवश्यक आहे.
घरी आपली काळजी करणारे आणि घेणारे इतरही लोक असतात, मात्र घराबाहेर असतांना आपण स्वतःच स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे आणि तेच आपल्याला वाचवू शकते.
safety first