संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ!

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच नाथ संप्रदायाचे जनक संत निवृत्तीनाथ महाराजpalkhi यांचे समाधीस्थान आहे. ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू तर होतेच मात्र ज्ञानेश्वरांनी त्यांनाच आपले गुरुही मानले होते. त्यामुळेच वारकरी संप्रदायाच्या अनुयायांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान आहे. दरवर्षी देहू आणि आळंदी येथून आषाढी एकादशीच्या यात्रेकरीता संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसह पायी वारी निघते, तशीच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचीही पायी वारी दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांच्या समाधीस्थळापासून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी निघणारी वारी तब्बल अठ्ठावीस दिवसाच्या प्रवासानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरांत दाखल होते. दरवर्षी सर्वात जेष्ठ वारी म्हणून या वारीला आषाढीत सन्मान मिळतो. विठ्ठलाच्या दरबारी निवृत्तीनाथांची पालखी सर्वात अगोदर भेट घेते.
यंदा ही पालखी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीच्या दिवशीच म्हणजेच शनिवार, २२ जून रोजी मार्गस्थ झाली. यंदाच्या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरीच्या वारीप्रमाणे निवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय ‘मानवंदना’ मिळाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमत्र्यांच्या उपस्थितीत यावर्षापासून या वारीत सहभागी होणाऱ्या विणेकऱ्यांचा यथोचित सन्मान केला आहे. संत निवृत्तीनाथांच्या पालखीच्या परंपरेला आता पर्यंत नाशिक जिल्ह्यात कुठलाही शासकीय मान मिळत नव्हता, तो यावर्षी सुरु करण्यात आला आहे. आता दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात निवृत्तीनाथांच्या विणेकर्यांचा सन्मान शाल, श्रीफळ देऊन करण्यात येणार आहे.
ही प्रथा सुरु झाल्याने वारकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होतोय. या वारीला सन्मान मिळाला असला तरी वारकऱ्यांना आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचे वारक-यांना वाटतंय.

One Comment