आदिमाया श्री सप्तशृंगी माता

71102216

महाराष्ट्रातील अत्यंत जाज्वल्य व जागृत साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री सप्तशृंगी देवी हे स्वयंभू शक्तिपीठ आहे. ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन गडावर स्थिरावला, अशी ही आदिमाया दशअष्ठभुजावाली महिषासुरर्मदिनी हीच महालक्ष्मी, हीच महाकाली व हीच महासरस्वती होय. या त्रिगुणात्मक आद्य शक्तिपीठाचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांतून आढळतो. सप्तशृंगीगडावर श्री भगवतीच्या तपस्येकरिता व आशीर्वादाकरिता अनेक थोर ऋषीमुनी, संत महात्मे आल्याचे दाखले आहेत. प्रभु रामचंद्र हे वनवासात असताना श्री भगवतीच्या दर्शनाला आले होते.

नाशिकच्या उत्तरेस ६५ कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या पर्वत रांगेत सात शिखरे असलेल्या गडावर समुद्रसपाटीपासून ४६00 फूट उंचीवर असलेल्या गडावर सप्तशृंगीमातेचा निवास आहे. गडाच्या पूर्वेस मार्कन्डेय पर्वत, सतीचा कडा, तर दक्षिणेस श्री गणेश मंदिर, शिवालय तीर्थ असून, चहूबाजूने असलेल्या निसर्गरम्य झाडांनी अच्छादिलेल्या पर्वताच्या रांगा, दर्‍या, धरणे, तलाव, जलधारा हे परिसराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. आनादि काळापासून घुमणारे मंत्रोच्चार ऋषीमुनीचा पावन चरणस्पर्श यामुळे हा परिसर आपल्यामधील अंतरात्माला साद घालतो, असा या आदिमातेचा मार्ग आहे. सप्तशृंगी गडावर दरवर्षी अश्‍विन, तसेच चैत्र महिन्यात श्री भगवतीचा नवरात्रोत्सव लाखो भाविकांच्या खरा आनंद मिळण्याचा मन:शांती जीवनाचा अनुभवण्याची व चराचराच्या जननीपुढे नतमस्तक होण्याचा असतो.