स्टेच्यू ऑफ युनिटी : एकतेचे प्रतिक
|सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या निर्भीड व्यक्तिमत्वामुळे त्यांना ‘लोहपुरूष’ म्हणूनही ओळखले जाते.
भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी देशाची आजच्याप्रमाणे प्रांतरचना नव्हती. देश वेगवेगळ्या लहानमोठ्या संस्थानांमध्ये विखुरलेला होता. ह्या सर्व संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून सरदार पटेल ‘आधुनिक अखंड भारता’चे शिल्पकार बनले. एका सामान्य शेतकरी कुटुंबांत जन्मलेल्या सरदार पटेलांनी शेतकऱ्यांनाही स्वातंत्र्य लढ्यात सामील करून घेतले. त्यांचा मूळ उद्देश ‘स्वराज्या’तून ‘सुराज्या’ची निर्मिती करण्याचा होता.
सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषाचे जीवन केवळ इतिहासाच्या पानांत बंदिस्त होणे भारतीय समाजाला मंजूर नाही. येणाऱ्या पिढीला त्यांचे जीवन प्रेरणामुर्ती स्वरूप कायम राहण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांना दिलेली सर्वांत मोठी श्रद्धांजली असेल! येणाऱ्या पिढींना अशी प्रेरणा मिळत राहण्याच्या उद्देशानेच सरदार पटेलांचे ‘स्टेच्यू ऑफ युनिटी’ नावाने एक भव्य-दिव्य स्मारक निर्माण करण्याचे गुजरात सरकारने ठरविले आहे.
जगांतील सर्वांत उंच असणारे हे स्मारक न्यूयॉर्क च्या स्टेच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दुप्पट तर, रियो-दि-जानेरो च्या ख्राईस्ट दि रिडीमर च्या स्माराकापेक्षा पांचपट उंचीचे असेल. तर, नर्मदा धरणापेक्षा त्याची उंची दीडपट अधिक असेल.
ह्या स्मारकाबद्दल आपले विचार व्यक्त करतांना गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी म्हणतात कि, “सरदार पटेलांच्या अशा स्मारकाचे निर्माण केले जाईल की जे जगांत सर्वांत उंच असेल, अतुलनीय असेल. जे फक्त देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योद्धयाचीच नाही तर अखंड भारताच्या शिल्पकाराचीही गाथा कथन करेल आणि सुराज्याच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रेरणा देत राहील!”
ह्या स्मारकाची उंची तब्बल १८२ मीटर असेल. सरदार सरोवर धरणापासून ३ किलोमीटर आंत नर्मदा नदी पात्रातील ‘साधू’ बेटावर हे स्मारक उभारले जाईल.जगांतील सर्वांत उंच धरणांपैकी एक असलेल्या सरदार सरोवर धरणासमोर दिमाखांत उभे राहणारे हे स्मारक सरदार पटेल यांच्या उच्च ईच्छाशक्ती आणि एकाग्रतेचे प्रतीक असेल.
ह्या स्मारकाच्या आवारांत ग्राम विकास, वनबंधू विकास, कृषी विकास आणि जल व्यवस्थापन तसेच सुराज्य ह्या विषयांवरील संशोधन केंद्र असेल.
मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून प्रेक्षक गॅलरी, सरदार पटेलांच्या जीवनावर आधारीत संग्रहालय, सरदार सरोवर प्रकल्पाची माहिती देणारे ध्वनीचित्र मुद्रित प्रदर्शनी, लेसर आणि साऊंड शो, रेस्टोरंट आणि कॅफे उपलब्ध असेल. वाहन प्रदूषणापासून बचावाकरिता नौकासेवेचा अवलंब केला जाईल.