“शिखर धवन” : भारतीय क्रिकेटचं भवितव्य

भारतीय क्रिकेटचं भवितव्य म्हणून ज्याच्याकडे पहिले जातं असा उदयोन्मुख खेळाडू म्हणून शिखर धवनचं नांव घेतलं जातं! shikharकेवळ एक कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळलेल्या शिखरबद्दल त्याच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील एकाहून एक धडाकेबाज खेळींमुळे विश्वास व्यक्त केला जातोय. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेते कप्तान कपिल देव यांच्या मते शिखरच्या खेळीने प्रेक्षकांना इतकी भुरळ घातली की सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग आणि  गौतम गंभीर यांची त्यांना आठवणही आली नाही!
मुळांत सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनी काळवंडलेल्या भारतीय क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर भारतीय चमू चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला. मात्र, शिखरच्या सरस खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज संघावर मिळविलेल्या एकामागून एक विजयाने त्या काळ्या आठवणी मागे पडल्या.
मुळचा दिल्लीचा असलेला शिखर धवन २७ वर्षीय डावखुरा फलंदाज आहे तसेच तो ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो. आतापर्यंत खेळलेल्या ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४७.५०च्या सरासरीने २८५ धाव केल्या आहेत ज्यांत  दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने आतापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळला असून त्यात विक्रमी १८७ धावा काढल्या आहेत. कसोटीत पदार्पण करतांना दीडशे धावा करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघात त्याला सहजासहजी स्थान मिळालं नाही. याआधी २००४ पर्यंत तो १९ वर्षांखालील भारतीय संघात होता. त्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान  मिळविण्याच्या प्रतीक्षेत होता. मात्र, भारतीय संघात आधीच ‘रथी-महारथीं’चा भरणा असल्याने त्याला स्थान मिळू शकले नाही. मात्र, मार्च-२०१२ मध्ये निवडसमितीने काही धाडसी निर्णय घेतांना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी फॉर्म हरविलेल्या तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागऐवजी शिखर धावांची निवड केली आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली. ह्या संधीचे त्याने सोने करून दाखविले.
त्याच्या हातून भारतीय क्रिकेटची जास्तीत जास्त सेवा घडो हीच सदिच्छा!