‘शिखर’…माणुसकीचे…!

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यांत काल झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यानंतर भारताचा नवोदित तडाखेबाज सलामीवीर शिखर धवन याच्यातील माणुसकीचे दर्शन घडले. shikhar
सध्या संपूर्ण देश उत्तराखंड मधील ढगफुटीमुळे झालेल्या जीवितहानी बद्दल हळहळ व्यक्त करीत आहे. चार धाम यात्रेकरिता गेलेल्या केदारनाथ, बद्रीनाथ तसेच उत्तराखंडातल्या अन्य तीर्थक्षेत्रांत अडकलेल्या, बेपत्ता झालेल्या लोकांच्या काळजीने त्यांचे कुटुंबीय तसेच देशवासी चिंतेत आहेत. आपद्ग्रस्त भागांत मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. संपूर्ण देशातून, विविध क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरु आहे. ह्या पार्श्वभूमीवर भारताने यजमान इंग्लंडवर त्यांच्याच देशांत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत विजय मिळविला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पांचही सामन्यांत भारताला मिळालेल्या विजयांत शिखर धवनचा मोलाचा वाटा राहिला. सलामीवीर म्हणून फलंदाजी करतांना त्याने ९०.७५ च्या सरासरीने ३६३ धावा केल्या. ह्यांत दोन तडाखेबाज शतके तसेच एका अर्धशतकाचा समावेश होतो. त्याच्या ह्यांच कामगिरीची दखल घेत आय.सी.सी.ने त्याचा मालिकावीर पुरस्कार तसेच गोल्ड बॅट पुरस्कार देवून गौरव केला. आपल्या देशातील परिस्थितीचे भान ठेवत आणि निसर्गाच्या प्रकोपाचा तडाखा बसलेल्या नागरिकांप्रती सहानभूती व्यक्त करतांना हा पुरस्कार त्याने ह्या नागरिकांनाच अर्पण केला. त्याच्या ह्या भूमिकेमुळे त्याच्यातील माणुसकीचे तसेच देशप्रेमाचे दर्शन घडले! आपल्या रुबाबदार मिशांना पीळ देत एकामागून एक दिमाखदार खेळी करीत क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाऱ्या शिखरने असे करून संपूर्ण देशवासियांची मने जिंकली!

ह्यापूर्वीही भारतीय खेळाडूंनी आपल्यांतील माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
दिल्लीत सामुहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर एका सामन्यातील विजयांत मोलाचा वाटा उचलणाऱ्या युवराज सिंगला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्याने बलात्कार पिडीत मुलगी ‘निर्भया’ला अर्पण केला होता. मनोज तिवारी यानेही वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात मिळालेला सामनावीर पुरस्कार कोलकातामधील एएमआरआय हॉस्पीटलमध्ये मरण पावलेल्यांना समर्पित केला होता.

One Comment