पेट्रोल दरवाढीवर ‘रामबाण’ उपाय : सायकलचा वापर वाढवावा

काल पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढ करण्यात आली. पेट्रोल आता ऐशीच्या घरात पोहोचले आहे. cycleडॉलरचा भाव वाढल्याने ही दरवाढ झाली असे सांगण्यात येत असले, तरीही गेल्या काही वर्षात इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकाला स्वयंचलित वाहने परवडेनाशी झाली आहेत. मात्र, तरीही स्वयंचलित वाहनांची संख्या रोजच वाढते आहे. ह्यामुळे प्रदूषण आणि रहदारी ह्या दोन्ही समस्या वाढल्या आहेत. रस्त्यावरील अपघातांचेही प्रमाण वाढले आहे.

पूर्वी सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. मोलमजुरी करणाऱ्यांपासून चाकरमान्यांपर्यंत सगळेच जण सायकलचा वापर करायचे. त्यामुळे प्रदूषणही कमी व्हायचे. रहदारीही कमी होती. परिणामस्वरूप रस्त्यावरील दुचाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाणही कमी होते. सायकल चालविल्याने शरीराचा व्यायाम होत असल्याने शरीरही सुदृढ राहण्यासही मदत व्हायची.

आज मात्र सायकल वापरणे म्हणजे कमीपणाचे समजले जाते. पूर्वी मुलगा दहावीत असला की सायकलचे अमिष दाखवून परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी उद्युक्त केले जायचे. आता मात्र तिथेही सायकलची जागा ‘गाडी’ने घेतली आहे. अगदी मोलमजुरी करणाराही थोडे चांगले पैसे कमावता झाला की मोटरसायकल घरी आणतो. त्यामुळे त्याची सोय होत असली तरीही खिशाच्या होणाऱ्या गैरसोयीकडे तो सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. रोज किमान ५-१० किमीचे अंतर सायकलने कापणे सहज शक्य आहे. गावातल्या गावात सायकलचा वापर करण्यास काय हरकत आहे? शाळेत, कार्यालयात, बाजारात जाण्यासाठी वा अन्य कामांसाठी गावातल्या-गावात जाण्याकरीता गाडी ऐवजी सायकलचा वापर केल्यास रहदारी तर कमी होईलच मात्र, प्रदूषणही कमी होईल आणि इंधनाचीही बचत होईल. त्यामुळे खिशावरील इंधनाचा बोजाही कमी होईल. कुठल्याही उत्पादनाची मागणी जास्त आणि आवक कमी झाली की त्याची दरवाढ अटळ असते. पेट्रोलचा मर्यादित वापरच आपल्याला पेट्रोल दरवाढीपासून मुक्त करू शकतो. म्हणूनच सायकल चालविण्यावर भर दिला पाहिजे. स्वतः सायकलचा वापर करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

इंधनाचा साठा मर्यादित आहे. तो जास्त काळ टिकावा यासाठी इंधनाचा वापर कमीत-कमी आणि गरजेपुरता करण्याची गरज आहे. इंधनाचा असाच अमर्याद वापर होत राहिला तर एकदिवस इंधनाचे साठे संपतील आणि एका भयंकर समस्येला मानवाला तोंड द्यावे लागेल. नवनवीन संशोधन करून मानव प्रत्येक गोष्टीला पर्याय काढत असला तरीही इंधानाशिवाय बऱ्याच बाबतीत काम करणे अशक्य आहे.

 

One Comment