स्पॉट फीक्सिंग

IPL 6जंटलमन लोकांचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटच्या बाबतीत आजचा दिवस काळाकुट्टच मानावा लागेल. कारण, आयपीएलच्या ६व्या पर्वातील तब्बल तीन सामन्यात स्पॉट फीक्सिंग झाल्याचे समोर येत आहे.
राजस्थान रॉयल्स कडून खेळणाऱ्या एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेलीया ह्या तीन खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप ठेवत पोलसांनी त्यांना अटक केली आहे. सात बुकींनादेखील अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली. श्रीशांत आणि बुकींना दिल्लीतून तर, चंदेलीया आणि चव्हाणला मुंबईत अटक करण्यात आली. त्यांच्यावर मोहाली आणि मुंबईतील सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ५ मेच्या जय पूर येथे पुणे वॉरिअर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात अजित चंदेलीयाने, ९ मे रोजी मोहाली येथील राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यातील सामन्यात श्रीशांतने तर १५ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडीयन्स यांच्यातील सामन्यात अंकित चव्हाणने स्पॉट फिक्सिंग केल्याचे समोर आले आहे. त्यांनी आपापल्या ओव्हर मध्ये १४ वा त्यापेक्षा अधिक धावा देण्याच्या बदल्यात बुकींकडून ४० ते ६० लाख रुपये घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. ह्या प्रकरणाशी इतर खेळाडूंचा संबध तपासण्यात येत आहे. ह्या प्रकरणाशी अंडरवर्ल्डचं संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या ह्या घटनेने संपूर्ण क्रीडाविश्व हादरले असून उलटसुलट चर्चेला उधाण आले असून दोषींवर कडक कारवाई करण्याची तसेच दोषी खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्याची मागणी होत आहे. .