विद्यार्थ्यांचा धाक शिक्षकांना….?

विद्यार्थ्यांचा धाक शिक्षकांना….? teacher

नेटवरील बातम्या वाचतांना सहज एका बातमीवर नजर गेली आणि मन विषन्न झाले. तामिळनाडू राज्यातील नमक्कल येथल्या एका खाजगी शाळेतील शिक्षिकाने वर्गातील आठ मुले अभ्यास करत नसल्याबद्दल तंबी दिली होती. त्यांच्या पालकांना शाळेत भेटायला बोलावले असता घाबरलेल्या सहा विद्यार्थ्यांनी विष घेऊन चक्क आत्महत्येचा प्रयत्न केला.

शिक्षकांचे मुलांवर रागविणे अथवा शिक्षा करणे हे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठीच असते. काही कटू अनुभवांनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करावयाच्या शिक्षेवरही ‘आचारसंहिता’ लादली गेली. विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण अथवा शारीरिक इजा पोहोचविणाऱ्या शिक्षेंवर पायबंद घातला गेला. त्यामुळे विद्यार्थी चुकले जरी तरीही त्यांना शिक्षा करण्याआधी शिक्षकांना चारदा विचार करावा लागतो.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल पालकांना वेळोवेळी अवगत करणे शिक्षकाचे कर्तव्यच असते. असे करणारी शाळा विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष पुरविणारी शाळा म्हणून ओळखली जातेच, मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतही सुधारणा बघावयास मिळते. विद्यार्थ्यांनी अभ्यास न करण्याची माहिती त्यांच्या पालकांना देणे स्वाभाविकच गोष्ट आहे. असा आत्महत्येचा प्रयत्न करून शिक्षक आणि पालकांना ‘ओलीस’ धरण्याचाच हा प्रकार आहे. यातून त्यांचे नुकसान कमी, संबंधित विद्यार्थ्यांचेच नुकसान अधिक होते. यातून बोध घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आपल्याप्रती भावना समजून घेऊन स्वतःची प्रगती साधावी.