विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस आणि रिक्षांविषयी घ्यावयाची काळजी…
|नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. रस्त्याने जाता-येतांना शाळेच्या गणवेशातील मुलांची वर्दळ दृष्टीस पडते. बालवर्गापासून तर अगदी पदवीशिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व जण शाळा-कॉलेजात जाण्या-येण्यासाठी बहुतेक करून स्कूल बस अथवा रिक्षाचा वापर करतात. दुर्दैवाने बऱ्याचदा अशा रिक्षा अथवा स्कूल बसला अपघात होऊन विद्यार्थी गंभीर जखमी होतात तर काहींना आपले प्राणदेखील गमवावे लागल्याच्या घटना ऐकिवात आहेत. ह्या घटना टाळण्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे….
१) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस अथवा रिक्षाचा चालक प्रशिक्षित आणि परवानाधारक असावा.
२) पालकांनी रिक्षाचालक आणि बसचालकाचे नांव, पत्ता आणि मोबाईल नंबर इ. आवश्यक माहिती जवळ ठेवावी.
३) चालक मद्यपान करून वाहन चालवीत असेल तर त्याला वेळीच रोखावे आणि संबधित यंत्रणेकडे तक्रार करावी. रिक्षाचालक मद्यपान करून रिक्षा चालवीत असेल तर ती रिक्षा बंद करून नवीन रिक्षा चालू करावी.
४) क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नयेत. दाटी-वाटी करून विद्यार्थ्यांना बसवू नये.
५) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांची शासकीय यंत्रणेकडे नोंद करणे आवश्यक करावे. अशा वाहनांची शासनाच्या संबंधित खात्याकडून वेळोवेळी तपासणी करणे बंधनकारक करावे.
६) रिक्षाच्या उजव्या बाजूला लोखंडी पट्टी लावावी तसेच स्कूल बसच्या खिडक्यांना जाल्या बसविणे सक्तीचे करावे.
७) मुलांना बसमध्ये चढण्या-उतरविण्याकारीता चालकाव्यतिरिक्त एका मदतनीसाचीही व्यवस्था करावी.
८) विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्याकारीता शाळा प्रशासन आणि पालकांनी एकमेकांशी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करावा.