शिवी न देण्याची शपथ..

शिवी न देण्याची शपथ…..
आजकाल सगळीकडे कुणीही बोलतांना शिवीचा बिनधास्त वापर करतांना आढळतात. ‘संभाषणातील शिवी म्हणजे जणू जेवणात वापरलेले मीठ’ इतके हे प्रमाण अधिक आहे. ह्या शिव्यांचा अर्थ प्रत्येकाला समजतो, shoutingमात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. दिलेल्या शिवीच्या अर्थाचा नंतर शांतपणे विचार केला तर स्वतःचीच स्वतःला लाज वाटेल. यावर उपाय करण्याचा प्रयत्न म्हणून की काय गेल्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिवी न देण्याची शपथ दिली. शाळा-महाविद्यालयात शिव्यांचा वापर होऊ नये यासाठी हि उपाययोजना असली, तरीही याचा सकारात्मक परिणाम होऊन जर विद्यार्थी शिवी देण्याचे टाळू लागले आणि हीच सवय आयुष्यभर जपली तर ‘शिवीविरहीत महाराष्ट्र’ची निर्मिती होऊ शकेल. आजकाल लोकप्रतिनिधी देखील सर्रासपणे शिव्यांचा वापर करतांना आढळतात. आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत आणि लोक आपल्याला बघत आहेत याचेही त्यांना भान नसते. बरे शिवी देतांना समोरचा पुरुष आहे कि स्त्री याचाही विचार हे लोक करत नाही. त्यावेळी असे वाटते, कि जर हे शाळेत असतांना यांना अशा प्रकारची शपथ दिली गेली असती आणि त्याचे यांनी पालन केले असते तर असे घडले नसते. आपल्या आणि इतरांच्या वडिलधाऱ्यांचा मान राखण्याच्या आणि एक आदर्श भारत घडविण्याच्या दृष्टीकोनातूनतरी ह्या घटनेचे महत्व अधिक आहे! याचे विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करावे हीच अपेक्षा!