वारी ! भक्तीची अखंड माळ…!

   वारी ! दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांच्या साथीने ‘ज्ञानोबा-तुकोबा’ माउलींच्या पालखीसह श्रीक्षेत्र पंढरपूर कडे मार्गक्रमण करणारा ‘भक्तिसागर’! एरवी नदी सागराला जाउन मिळते, मात्र येथे वारकऱ्यांचा हा ‘भक्तिसागर’ चंद्रभागेच्या तीरी विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाला जाउन मिळतो!  आपले दुःख-कष्ट, अडी-अडचणी एवढेच काय शारीरिक व्याधीही विसरून वारकरी विठ्ठलभक्तीत तल्लीन होत वारीत सामील होत असतो! palkhi
आषाढीची वारी म्हणजे वारकऱ्यांकरीता उत्साहाने भरलेला एक आनंदसोहळाच असतो! लाखो सहकारी वारकऱ्यांच्या साथीने चालतांना जात, वर्ण, स्त्री-पुरुष, उच-निच आणि इतर भेद न जुमानता जणू संतांच्या प्रबोधनवादी, पुरोगामी विचारांचा संदेश ह्या जगास देत वारकरी विठूमाउलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत असतो.
वारीतला वारकरी एका आदर्श ‘संघटना’चेच दर्शन घडवितो. स्वतः वारीत चालत असतांना सोबत चालणाऱ्या इतर वारकऱ्यांचीही काळजी त्याला असते. कुणी मागे राहिले तर नाही, कुणाचे काही दुखले-खुपले याचीही काळजी तो घेत असतो. वारीच्या निमित्ताने अनेक अज्ञात दानशुरांचेही दर्शन घडते. वारीतील वारकऱ्यांच्या भोजन आणि इतर व्यवस्थेसाठी अनेक अज्ञात दानशूर सढळ हाताने मदत करीत असतात. अनेक डॉक्टर आणि त्यांचे सहकारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारीच्या मार्गावर सज्ज असतात. अशा अनेक ज्ञात-अज्ञात वारकऱ्यांची सेवा दरवर्षी विठ्ठलचरणी अर्पण होत असते!
शेवटी भक्ती हीच श्रेष्ठ असते! तीच दरवर्षी एकमेकांनाही अनोळखी असलेल्या लाखो लोकांना वारीच्या माळेत एकत्र गुंफते!

2 Comments