लोड शेडींग का होते?

 आज प्रत्येकाला पडणारा हा प्रश्न आहे.

electricity

आज प्रत्येकाला पडणारा हा प्रश्न आहे. लोड शेडींग करीता आपण सरकारलाच दोषी धरत असतो. काहीअंशी ते सत्य असले तरी काही गोष्टींना आपणही जबाबदार आहोत. वाढत्या लोकसंख्येमुळे, सुधारित जीवनपद्धती, वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे विजेची मागणी वाढली. मात्र उर्जा उत्पादित करणारे स्त्रोत मर्यादितच आहेत. त्यामुळे मागणीच्या प्रमाणात विजेचे उत्पादन कमी होते. हे लोडशेडिंगचे एक मुख्य कारण आहे. त्याकरीता अधिकाधिक वीज निर्मिती केंद्र उभारायला हवीत, जेणेकरून विजेच्या मागणीची पूर्तता करणे सोपे जाईल. हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, आपण बऱ्याचदा काही ठिकाणी गरज नसतांनाही विजेचा वापर करतो. विजेचा अतिरिक्त वापर टाळला तरीही लोडशेडिंगवर मात करता येऊ शकते. वीजचोरीही लोडशेडिंगचे एक कारण आहे. ज्या भागात वीजचोरी होते त्या भागात वीजवितरण कंपनी लोडशेडिंग करत असते. मुख्यतः ग्रामीण भागात आणि झोपडपट्टी भागात ही समस्या जाणवते. चोरून वीज वापरणे बंद झाले तरीही लोडशेडिंगपासून मुक्तता मिळू शकते. वीजबिलाची थकबाकीही एक कारण आहे. ज्या भागात अधिकाधिक लोक वीजबिल थकवितात त्याभागात लोडशेडिंग केले जाते. लोकांनी वीजबिल वेळेवर भरावित हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणूनच वीजबिलाचा वेळच्यावेळी भरणा केल्यास लोडशेडिंग करावे लागणार नाही.