ऑनलाईन जगाच्या बाहेर

आजकाल तरुणाई मध्ये फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेट्वर्किंग वेब-साइट्स ची क्रेझ फार वाढलेली आहे. @symbolप्रत्येक जण आपण नेहमी ऑनलाईन राहण्यासाठी धडपडत असतो. ह्या वेब साइट्सवर खाते नाही असा तरुण शोधून सापडणार नाही. ह्या वेब साइट्सवर आपण अनेक मित्र जमवितो, त्यांच्याशी अनेक गोष्टी शेयर करतो, त्यांच्याविषयी जाणून घेतो. यातील बऱ्याच लोकांना तर आपण कधी प्रत्यक्ष भेटलेलोही नसतो अथवा प्रत्यक्ष ओळखही नसते, मात्र तरीही आपल्या अनेक खाजगी गोष्टींमध्ये त्यांना आपण सामील करून घेतो आणि आपणही होतो. ह्या वेब साइट्सच्या माध्यमातून तयार झालेल्या ह्या मैत्रीच्या नात्याला न्याय देण्याचाच आपला प्रयत्न असतो.

मात्र असे करीत असतांना एक विचार आपण कधी केलाय की, आपल्या सभोवताली वावरणारे आपले मित्र, कुटुंबीय, सहकारी यांच्याशी असलेल्या नात्याला आपण योग्य न्याय देतो? आपल्या खाजगी गोष्टी अथवा अडी-अडचणी त्यांच्यासमोर मांडतो? त्यांच्या सुख-दुःखात सामील होतो? ह्या प्रश्नांचे ज्यांचे उत्तर “नाही” असे असेल त्यांनी ओंनलाईन कितीही मित्र जमविले तरीही प्रत्यक्ष जीवनात मात्र ते एकटेच असतात. हा एकटेपणा घालविण्यासाठी आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत शक्य तितका जास्त वेळ घालविणे आवश्यक आहे. त्यांच्यासमोर आपले विचार, अडी-अडचणी मांडणे, त्यांच्यासोबत करमणुकीचे काही क्षण घालविणे आवश्यक आहे. तरच त्यांच्याशी असलेल्या आपल्या नात्याला योग्य न्याय देता येईल!

आपल्या कुटुंबसदस्यांसमवेत चांगले नाते तयार करीत असतांना सभोवताली आपले जीवाभावाचे चार-दोन मित्र असणेही आवश्यक आहे. असे मित्र असले कि आपल्याला एकटेपणा वाटत नाही. त्यांच्या सुख-दुःखात सामील होतांना थोडाफार हातभार जरी लावला तरीही असे मित्र वेळ पडल्यावर आपल्यासाठीही मदतीला धावून येतात. मैत्रीच्या नात्यात स्वार्थाला जागा नसते. असे कित्येक लोक समाजात पाहायला मिळतील की जे पैशाने, संपत्तीने कितीही श्रीमंत असतील, मात्र प्रत्यक्ष जीवनात कुणाशी चांगले, मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित न केल्याने सुख-दुःखाच्या क्षणी एकटे पडतात आणि काही लोक पैशाने गरीब जरी असले, मात्र इतरांशी चांगले संबंध असल्याने त्यांचे काहीही अडून राहत नाही.

नात्यांचे महत्व जाणून नाती जोपासणे गरजेचे आहे. सोशल नेट्वर्किंग वेब साइट्स वर आपली खाती नसावीत अथवा तेथे आपण मित्र जमवू नयेत असे माझे कदापि म्हणणे नाही. उलट आपले विचार मांडण्यासाठी एक चांगले व्यासपीठाच ह्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहे. मात्र, प्रत्यक्ष जीवनातही आपण नात्यांना योग्य न्याय दिला पाहिजे आणि असे नवनवीन मित्र जमवून टिकवलेही पाहिजेत!