नोकरी करणारी स्त्री

working    आजकालच्या महागाईच्या जमान्यात कुटुंबातील दोघेही कमावते असणे गरजेचे झाले आहे. बरेच कुटुंब असे आहेत की जेथे दोघेही कमावतात. महागाईच्या जमान्यातही आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करणे आणि आपले कुटुंब सुखवस्तू बनविणे यासाठी स्त्रीही नोकरी करते. मात्र, अशा स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर असे दिसून येते की पुरुषांपेक्षा कुटुंबाची कितीतरी अधिक जबाबदारी ह्या स्त्रियाच पार पाडत असतात. कुटुंबाच्या आर्थिक बाबीत बरोबरीचा वाटा उचलणाऱ्या ह्या स्त्रिया गृहिणी म्हणून असलेली आपली इतर जबाबदारीही पार पाडण्यासाठी धडपडत असतात. नोकरीवर जाण्याआधी स्वयंपाक आणि घरातील इतर कामे उरकण्यासाठी आदल्या रात्री झोपायला कितीही उशिर झाला असेल, मात्र तरीही सकाळी लवकर उठून कामाला लागतात. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आणि लहान मुलांचे दुखणे-खुपणे, त्यांचे हवे-नको ते सगळे पूर्ण करण्याची जबाबदारी त्या पार पाडतात. मुलांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिगत गरजाही त्याच जाणून घेऊन पूर्ण करतात. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करणे याचीही जबाबदारी त्यांच्यावरच असते. नोकरीवरून परत आल्यावर पुन्हा घरातील कामे आलीच. म्हणजे उसंत अशी नाहीच! त्यासाठी त्या सुटीच्या दिवसाची वात पाहत असतात.

सुटीच्या दिवशीही काही वेगळे नसते. नोकरीच्या दिवसात राहिलेली कामे उरकण्यातच सगळा दिवस जातो. इतर दिवशी वेळेअभावी घरातल्यांना काही नवीन ख्यायला बनविता आले नाही म्हणून अधिकाधिक वेळ यांचा किचनमध्येच जातो. दिवस संपत आल्यावर आजही आराम नाही मिळाला म्हणत उद्या पुन्हा कामावर जावे लागणार म्हणून उद्याच्या दिवसाची तयारी सुरु होते. अशा स्त्रीला ह्या व्यस्त जीवनातून थोडी उसंत मिळवून देण्याची जबाबदारी तिच्या पतीने उचलायला हवी. अगदी स्वयंपाकात नसेल जमत मात्र बाजार करून आणणे, मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना काय हवे-नको ते बघणे, कुटुंबातील वयस्क सदस्यांची दुखणी-खुपणी बघून त्यांची गरज भागविणे यात मात्र ते निश्चित मदत करू शकतात. शेवटी पती-पत्नी संसाराची दोन चाके असतात. यातील एक चाक जरी कमजोर झाले तरीही गाडी कोलमडू शकते.

शेवटी नोकरी करणारी स्त्री मुक्त विचारांची, स्वतः कमावणारी स्त्री सक्षम वाटत असली तरीही तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची, आरामाची काळजी घेणेही आपलेच कर्तव्य आहे.

One Comment